मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरावर सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा मारला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या कारवाईवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांनी अनिल देशमुखांची रवानगी तुरूंगात होणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुखचा घरी आज ED ईडीचे छापे, काही दिवसांनी जेलमधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकाता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्यामधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्यामुळे ३ वर्ष तुरूंगात होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तसेच ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांच्या घरी छापा मारला. मला खात्री आहे काही दिवसांनी ते तुरूंगात असतील. दुसरे वसुली मिनिस्टर अनिल परब यांचे देखील अनिल देशमुखांप्रमाणेच होईल, असं किरीट सोमय्यांनी ट्विट केलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूल करण्याचे निर्देश दिल्याचे आरोप केले आहेत. यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडी सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला. २५ मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.








