ऑनलाईन टीम / मुंबई :
सोमवारी रात्री उशीरा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अटक केली. त्यानंतर आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित 5 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आठवले म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुखांवर गुन्हा दाखल झाला. याविषयी गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरु होता. तपासानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्याची आवश्यकता होती. अनेकवेळा ईडीकडून सवलत दिली जाते, कारवाई केली जात नाही. ईडीला पुरावे मिळाल्यानंतरच कारवाई करण्यात येते. त्यामुळे देशमुख यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.
अजित पवारांविषयी बोलताना ते म्हणाले, आयकर विभागाने अजित पवारांना त्यांच्याशी संबंधित 5 मालमत्तांच्या तात्पुरती जप्तीची नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर अन्याय व्हावा असे आम्हाला वाटत नाही. ईडीच्या चौकशीत काही समोर आले नव्हते. त्यामुळे अजित पवारांनी आयकर विभागाच्या चौकशीला सामोरे जावे, असेही ते म्हणाले.