मुंबई / ऑनलाईन टीम
अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता सीबीआयची टीम चौकशीसाठी मंगळवारीच मुंबईत दाखल होणार आहे.
मुंबई हायकोर्टाने अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली आहे.
सोमवारी राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांनी दिल्ली गाठली. हायकोर्टाच्या आदेशाला अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी रात्री त्यांनी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.








