मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील फास आवळण्यास ईडीने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे, ईडीने मनी लॉन्डरिंग गुन्ह्यातील तपासात देशमुख यांनी काही खासगी बँकांकडून नियमबाह्य कर्जे काढून कुटुंबियाची मालकी असणार्या कंपन्यांमध्ये हे कर्जे ट्रान्स्फर केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. हे कर्जे देण्यासाठी आणखी कुणाचा सहभाग होता का, याची देखील चौकशी करण्यात येत आहे.
अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांसाठी ही कर्जे उचलण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश कंपन्या या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांनी अनियमितपणे या शेल कंपन्यांसाठी कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याबाबत प्राधान्याने माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आतापर्यंतच्या ईडीच्या तपासात अनिल देशमुख यांनी खासगी बँकांकडून अनेक असुरक्षित कर्जे घेतल्याचे आढळले आहे. ती मंजूर करताना नियमांचे उल्लंघन केले गेले असून, कर्जाचे पैसे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या कंपन्यांकडे वर्ग करण्यात आले असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. तसेच या कंपन्यांपैकी, ज्यांना कर्ज वाटप झाले त्यापैकी अनेक कंपन्या केवळ कागदावरच आहेत. त्यामुळे देशमुख यांनी किती बँकांकडून किती कर्ज घेतले होते, त्याची रक्कम किती होती, याचा ईडी तपास करीत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडीने देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली असून हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या दोघांच्या चौकशीत ईडीला देशमुख यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी अनेक माहिती मिळाली आहे. दरम्यान देशमुख आणि त्याचा मुलगा आणि पत्नीला ईडीकडून समन्स पाठवून देखील देशमुख आणि इतर कोणीही अद्याप ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले नाहीत.
Previous Articleशिराळ्यात अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व दुकाने बंद
Next Article कर्नाटक सीमेवरील आरटीपीसीआर रिपोर्ट सक्ती बंद करा








