महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
आपण स्वप्नात तर नाही, असा विचार अनिरुद्ध करू लागला. मनात भगवंताचे नामस्मरण करत तो मंचकावर तसाच पडून राहिला. इकडे उषा चिंता करू लागली. चित्रलेखेने तिला उपदेश केला होता. त्याप्रमाणे ती पुढे झाली व अनिरुद्धाचे पाय चेपू लागली. ती अनिरुद्धाला म्हणाली – नाथ! रात्र संपली. पूर्वेला सूर्यनारायणाचे आगमन झाले. यावेळी निद्रा कसली? आता उठा आणि आन्हीक उरका. तिने सोन्याच्या घागरीत गरम पाणी आणवले. नाथ! आता आपण मंचकावर उठून बसावे. मी आपले पाय धुते. आपण मुख प्रक्षालन करावे, असे ती अनिरुद्धाला सांगू लागली. त्याचवेळी चित्रलेखा तिथे आली व अनिरुद्धाला म्हणाली – स्वामी! आपण डोळे उघडून हा महाल तरी पहा. तेव्हा डोळे उघडून अनिरुद्ध म्हणाला – मी रात्री झोपलो होतो ते माझे शयनागार हे नव्हे. रात्री तू मला काही सांगितलेस, त्याचवेळी मला झोप लागली. आता जागा होऊन पाहतो तर ही सुंदर युवती येथे दिसते. ही कोण? त्यावर चित्रलेखा म्हणाली – महाराज! आपण स्वप्नामध्ये येऊन ज्या युवतीशी रतिक्रीडा केलीत तीच ही युवती. असुराधिपती बाणासुर महाराजांची ही कन्या आहे. तुमच्या शिवाय इतर कुणाचाही वर म्हणून मी विचारही करणार नाही, असा हिचा निर्धार आहे. तुमची प्राप्ती न झाल्यास प्राणही त्यागायला ही तयार झाली होती.
जन्मापासूनि हे मम सखी । म्हणूनि करुणा आली निकी । ईचिया दु:कें होवोनि दु:खी । मग म्यां लिहिलें द्वारकाभुवन । लिहूनि दाविलें म्यां त्रिभुवन । त्यामाजी नसे पुरुषरत्न । मग म्यां लिहिलें द्वारकाभुवन । तेथ तुम्हांलागोन ओळखिलें। तेव्हां निघालें गगनमार्गें । द्वारकापुर ठाकिलें वेगें । वृत्तान्त तुमचें मानस नेघे। निद्राप्रसंगें जाकळितां । तुम्हांसी मंचकीं लागली निद्रा। मग म्यां आणिलें शोणितपुरा । स्वप्नीं अनुभविली सुन्दरा । ते गृहिणी करा करग्रहणें । येरु म्हणे हें स्त्रीचरित्र । कायसा विवाह कोणतें सूत्र ।
येरी म्हणे यथाशास्त्र । गंधर्वतंत्र ये लोकीं । येरें स्मरूनि श्रीकृष्णचरण । हृदयीं चिंतिला संकर्षण ।
पिता प्रद्युम्न आठवून । म्हणे हे गहन विधिरेखा ।
गंधर्वांचा तुंबराचार्य। चित्रलेखा तो आणूनि आर्य। त्याच्या हस्तें विवाहकार्य। गान्धर्वविधीनें संपविलें । अभ्यंग हरिद्रा उद्वर्तनें । दिव्याभरणें दिव्य वसनें। अन्नपानें विधिविधानें। न लगे सांगणें याउपरी। ऐसी अनिरुद्धे पर्णिली उषा । गौरीवरें येरी पुरुषा। वरूनि पावली संतोषा । कुरुनरेशा शुक वदला ।
म्हणाल मूळीं हा विस्तार नाहीं । तरी पुराणें देती गाही । धर्मस्थापक शेषशायी । अविधि गेहीं वर्तेना।
अनिरुद्ध तों तयाचा पौत्र । अविधि नाचरे अणुमात्र । जारधर्माचें कलत्र । सदनीं अशास्त्र न ठेवी । पातिव्रत्याचरणें उषा । स्वप्नीं लाधली जया पुरुषा । त्यावीण आन न वरी सहसा । हा भरंवसा जाणोनी
Ad. देवदत्त परुळेकर









