सांगली / प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात खंडीत झालेली बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी सोमवारी सुरु झाली. यामध्ये मयत अनिकेत कोथळेचा मित्र आणि या खटल्याचा प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याची न्यायालयात साक्ष झाली. या खटल्याची सुनावणी जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी न्यायालयात भंडारे याची साक्ष काढली. आता मंगळवारी त्याची उलट तपासणी होणार आहे. सलग चार दिवस या खटल्याची सुनावणी होणार आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी खून केल्याची घटना दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी घडली होती. याप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरिक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले या संशयीतांच्या विरोधात खटला सुरु आहे. लुटमारीच्या संशयावरुन अटक केलेल्या अनिकेत कोथळे याच्यावर अमानुष थर्डडिग्रीचा वापर केल्याने पोलीस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयीतांनी तेवढ्यावरच न थांबता अनिकेतचा मृतदेह सुरुवातीला पोलीस गाडीतून आणि नंतर खासगी वाहनाने आंबोली घाटातील निर्जनस्थळी नेऊन जाळून खूनासारख्या गंभीर घटनेचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने संपूर्ण राज्याचे पोलीस दल हादरले होते.








