गोवा/प्रतिनिधी
५१ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फीचा शुभारंभ डॅनिश चित्रपट निर्माते दिग्दर्शक थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनादर राउंड’ या चित्रपटाने झाला. गोव्याच्या कला अकादमीत हा चित्रपट दाखविण्यात आला. डेन्मार्क कडून या चित्रपटाची ९३ व्या ऑस्करसाठी प्रवेशिका पाठवण्यात आली आहे.
गोव्याची राजधानी पणजी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयम येथे झालेल्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात या चित्रपटाचे ट्रेलर दाखवण्यात आले.
त्यावेळी व्हिडीओ संदेशातून दिग्दर्शक विंटरबर्ग यांनी चित्रपट रसिकांशी संवाद साधला आणि आपल्या चित्रपटाविषयी भाष्य केले. ‘सुरुवातीला मद्याचा उत्सव करत हा चित्रपट सुरु होत असला तरी हळूहळू त्यातील कथानक, जीवनाच्या उत्सवाकडे वळते” असे ते यावेळी म्हणाले.
कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवलेले मॅड्स मिकेल्सन यांची या चित्रपटात विशेष भूमिका आहे. १२ सप्टेंबर २०२० ला या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता. डेन्मार्क येथे २४ सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित झाला होता.









