एक सप्टेंबरपासून सुरु होणाऱया महिनाभरासाठी केंद्र सरकारने अनलॉक चारच्या मार्गदर्शक सूचना शनिवारी जाहीर केल्या. आता या सूचनांचा आधार घेऊन आणि स्थानिक परिस्थिती पाहून राज्य सरकारे आपले नियम, धोरण जाहीर करतील.एकीकडे जगभर, देशात कोरोनाचा कहर सुरू आहे तर दुसरीकडे कोरोना टेस्ट मोठय़ा प्रमाणात घेतल्या जात आहेत, तिसरीकडे कोरोना लस व औषध यावरही गतीने काम सुरु आहे आणि चौथीकडे कोरोनामुळे आर्थिक चाक रुतून सारे ठप्प पडू नये यासाठी अनलॉक कसरतही केली जाते आहे. पण या सर्व धडपडीत कोरोना चार्ट धडकी भरवत आहे.. जगाच्या तुलनेने आपला देशाचा कोरोना मृत्यूदर कमी असला तरी आणि कोरोनावर मात करणाऱयांची संख्या चांगली असली तरी आपला देश, लोकसंख्या, लोकवृत्ती आणि महामारीचे संकट याचा विचार करता कोणतेही समाधान मानावे अशी स्थिती नाही. महाराष्ट्रात तर हॉटस्पॉट मानावा अशी स्थिती आहे. अशावेळी अनलॉक चार कसा स्वीकारला जातो. मेट्रो, मंदिरे, मशिदी, प्रवास, शाळा, परीक्षा या संदर्भात कशी पावले उचलली जातात हे महत्त्वाचे आहे पण धोरण अनलॉकच्या दिशेने पुढेपुढे सरकते आहे हे समजून घेतले पाहिजे. मंदिरे खुली करा यासाठी भाजपाने महाराष्ट्रात शनिवारी सर्वत्र निदर्शने केली. यामध्ये राजकारण तर आहेच जोडीला तिघाडी सरकारवर, त्यातील घटक पक्षांवर टीका करायची संधी म्हणूनही बघितले जाते आहे. भाजपने जिह्याजिह्यात आंदोलन केले, निवेदने दिली.दारु दुकाने सुरू आणि देवळे बंद हा मुद्दा केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय पक्षांना आस्तिक, नास्तिक आणि भूते वगैरे विशेषणे जोडली. त्याच जोडीला एमआयएमने मशिदी प्रार्थनेसाठी खुल्या करा यासाठी आवाज उठवला आहे. दोन्ही पक्षाचे विचार वेगळे असले तरी मागणी एकच आहे. तथापि मंदिर-मशिदी खुल्या करणे, जलतरण तलाव,शाळा,वाचनालये सुरु ठेवणे लगेच शक्मय होईल असे वाटत नाही. अनलॉक चारचे जे मार्गदर्शक निर्देश केंद्राने दिले आहेत त्यामध्ये सामुहिक कार्यक्रमाना सशर्त अनुमती दिली जाणार आहे. 21 सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक,धार्मिक, राजकीय कार्यक्रम आयोजित करता येणार आहेत. म्हणजे आता शंभर जणांच्या उपस्थितीत विवाहसोहळे होणार, ओपन थिएटरमध्ये मनोरंजन कार्यक्रम होणार, बैठका, सभा होणार, पण सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर व उपस्थिती कमाल शंभर अशी अट आहे. अनलॉक चारच्या नव्या दिशा निर्देशात मेट्रो रेल्वे सात सप्टेंबरपासून कालबद्ध पद्धतीने सुरू होणार आहे. मुंबईत लोकल व मेट्रो यांना लाईफलाईन म्हटले जाते, त्या बंद म्हणजे मुंबई बंद आणि मुंबई बंद म्हणजे भारताची आर्थिक राजधानी व अर्थव्यवस्था अडचणीत असे समीकरण आहे. मेट्रोच्याच जोडीला अंतर्गत व आंतरराज्य प्रवासावर बंदी असणार नाही. देशात कोठेही जाण्यासाठी परवानगी गरजेची नाही. मात्र आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद राहणार आहेत. कन्टेंटमेंट झोन वगळता इतरत्र टाळेबंदी लागू करता येणार नाही. शाळा, महाविद्यालय, परीक्षा हा विषय तापला आहे. केंद्रीय निर्देश लक्षात घेता 30 सप्टेंबरपर्यत शाळा, महाविद्यालये बंदच राहणार. ऑनलाईन शिक्षण, दूरस्थ शिक्षण सुरू राहील. नववी ते बारावीचे विद्यार्थी स्वतःच्या जबाबदारीवर व पालकांच्या लेखी अनुमतीने शाळेत शिक्षकांना भेटू शकतात. एकूणच आपल्या जबाबदारीवर आपण निर्णय घेऊ शकतो. आता राज्यांचे मुख्यमंत्री यावर काय सांगतात ते लगेच कळेल पण आपण काय करायचे हे ज्याने त्याने स्वतः ठरवले पाहिजे. परवानगी असली तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नका, महामारीचे नियम काटेकोर पाळा, लहान मुले, ज्ये÷ नागरिक आणि आजारी जन यांनी अनलॉक असले तरी काळजी घेतली पाहिजे.सरकारने निर्देश देऊन अनलॉकची दिशा स्पष्ट केली आहे आता आपण आपल्या जबाबदारीवर पुढची पावले टाकली पाहिजेत. शिर सलामत तो पगडी पचास ही गोष्ट विसरता कामा नये. पुढील काही महिने वर्तन काटेकोर हवे. महामारीचा कहर आणि उपचार, बेड, सुविधा, खर्च, त्रास याचा विचार करुनच या अनलॉक चारचे निर्देश लक्षात घ्यावेत. लस येऊन कोरोना पूर्ण पराभूत होत नाही तोवर सावध राहणे, घरी राहणे, नियम पाळणे याला पर्याय नाही. पदवी, सी ई टी परीक्षा या संदर्भात न्यायालय आदेश आणि पालकांना, विद्यार्थ्यांना असणारी भीती असे वातावरण दिसते आहे. परीक्षा घेण्यासाठी कुलगुरुची एक समिती केली आहे. ही समिती सुलभ, सुरक्षित परीक्षेसाठी सरकारला सांगणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय जाहीर करणार आहे तर सीईटी तालुकास्तरावर घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकंदरीत यंदाचे शैक्षणिक वर्ष अडचणीत दिसते आहे. केंद्राने नवे शैक्षणिक धोरणही जाहीर केले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या सर्वाचे परिणाम शिक्षण, शाळा, नोकऱया, शिक्षण व्यवस्था यावर होणे अपरिहार्य आहे. काळाबरोबर चालणे काळाच्या पुढे नजर ठेवणे आणि आव्हानांवर स्वार होत यश खेचून आणणे याला पर्याय नाही. सरकार,विद्यापीठ, विद्यार्थी, पालक, धोरणकर्ते सर्वासाठी आगामी काळ आव्हानात्मक असणार हे उघड आहे. जग या संकटात कुस बदलणार हे स्पष्ट आहे. अशावेळी पुढच्या हाका सावधपणे ऐकून तेथेही निर्धारपूर्वक पावले टाकली पाहीजेत. येणारा काळ कसोटीचा जसा आहे तसा तो संधीचाही आहे. निर्धाराने, सुरक्षित वाटचाल करण्यावाचून गत्यंतर नाही. आता मुख्यमंत्री काय सांगतात हे बघायचे आणि जनतेनेही आपली काळजी आपणच केली पाहिजे याचे भान क्षणभरही सोडू नये, त्यातच हित आहे.
Previous Articleरागावणे: काही अनुभव
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








