ऑटोनगर येथील आरटीओ कार्यालयात गर्दीमुळे नियम धाब्यावर : नियमांचे पालन करण्याचे अधिकाऱयांकडून आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनाच्या दुसऱया लाटेत संपूर्ण जनताच होरपळली आहे. अशा परिस्थितीत सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. लॉकडाऊनमुळे आरटीओ कार्यालय पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. आता आरटीओ कार्यालय सुरू झाले आहे. त्यामुळे वाहन नोंदणी आणि इतर कामे करण्यासही सुरुवात झाली आहे. सोमवारी ऑटोनगर येथे वाहन नोंदणीसाठी एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून आले. याचबरोबर येथील अधिकारी नियम पाळावेत, असे आवाहन करत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळाले.
बेळगाव आरटीओ कार्यालयातील कामकाज काही प्रमाणात सुरळीत ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात ऑनलाईन कामकाज सुरू होते. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने आरटीओ कार्यालयाही सुरू झाले. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळूनच आपापली कामे करून घ्यावीत, असे आवाहन आरटीओ शिवानंद मगदूम हे वारंवार करत असले तरी नागरिकांनी दुर्लक्ष करण्यावरच अधिक भर दिल्याचे दिसून आले.
सोमवारी ऑटोनगर येथील आरटीओ कार्यालयाकडे एकच गर्दी झाली. वाहन नोंदणी आणि वाहन परवाण्यासाठी गर्दी करण्यात आली. ही गर्दी अधिक असल्याचे दिसून आले. यावेळी आपल्या वाहनांसमवेत वाहन नोंदणी करण्यासाठी गर्दी झाली. वाहन परवाना काढणे, त्यासाठी अर्ज भरणे, परवान्यासाठी लागणारी फी भरणे, वाहनांची नोंद करणे यासह अनेक कामांसाठी नागरिक आरटीओ कार्यालयात गर्दी करतात. राज्य सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. आता सुरू झाल्याने मोठी गर्दी उसाळली होती.
राज्य सरकारच्या महसुलात वाढ करून देणारे आरटीओ हे महत्त्वाचे कार्यालय असून ते बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत असल्याची तक्रार करण्यात आली. मात्र कोरोना काळात सरकारनेच अधिक गर्दी होत असणाऱया कार्यालयांमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची शक्मयता असल्यामुळे हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र ऑनलाईन कामे असतील तर ती करून देण्यात येत होती. आता आरटीओ कार्यालय सुरू झाल्याने या ठिकाणी गर्दी होत आहे.
सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना
सोशल डिस्टन्सबाबत जनजागृती करूनही नागरिक ऐकत नाहीत. कोरोनाचे नियम पाळावेत यासाठी खुद्द आरटीओ शिवानंद मगदूम हे कार्यालयाबाहेर पडून वारंवार रांगेत उभे राहिलेल्या व्यक्तींना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करत कामे करून घेण्याचे आवाहन आरटीओ शिवानंद मगदूम यांनी केले.









