प्रतिनिधी/सांगली
जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरु लागली असून रुग्णसंख्या कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी रेटही 11 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात अनलॉकला सुरुवात झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी करुन सर्व सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील आज रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. जिह्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढणार नाही, याबाबतची दक्षता घेणे, लसीकरण वाढविणे तसेच तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांबाबतचा आढावाही घेतील.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने 6 ते 17 मे आणि 19 ते 31 मे या कालावधीत कडक अंमलबजावणी केली. या कालावधीत नियमांचे कडक पालन केल्याने रुग्णसंख्या कमी झाली. चार दिवसांपासून हजाराच्या आत नवे रुग्ण आढळत आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने पॉझिटिव्हिटी रेटही कमी होत आहे. सध्या 11 टक्क्यांवर आला आहे, त्यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथील करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागणार असल्याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याकडून सविस्तर आढावा घेतला जाईल.
शासनाने प्रत्येक जिह्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाहून संबंधित जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. जिह्यात शिथिलता मिळण्यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांच्या आत यायला हवा. तो 10 टक्क्यांच्या आत येऊन स्थिरावण्यासाठी आणखी काय उपाययोजना कराव्या लागतील, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या अधिकाऱयांसोबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र वेळ वाढवून दिल्यानंतर गर्दी होऊन सोशल कडक पालन आदी, याबाबत नियंत्रण ठेवण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री देतील.
सध्या लसीकरण मोहीम मंदी गतीने सुरु आहे. शासनाकडून लस उपलब्ध होत नाही. चार दिवसांतून एकदा लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे बहुतांशी वेळा लसीकरण केंद्र बंद असतात. त्यामुळे नागरिकांना लसीसाठी वाट पाहवी लागते. लसींचा पुरवठा नियमित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत चर्चा होईल. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पुन्हा तिसऱया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिसऱया लाटेमध्ये युवकांना अधिक प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ऍक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेशही पालकमंत्री पाटील देण्याची शक्यता आहे.








