कारवार जिल्हाधिकाऱयांचा आदेश
वार्ताहर /रामनगर
बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूरपासून अनमोडपर्यंतचे रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याने कारवार जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार बुधवारपासून अनमोड घाटमार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे.
बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूरपासून अनमोडपर्यंतचा रस्ता अर्धवट असल्याने वाहनधारकांना मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेली दोन-तीन वर्षे न्यायालयाच्या स्थगितीमुळे सदर रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे. सदर काम घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने महामार्गाचे काम जमत नसल्याने या भागातील सर्व सामग्री घेऊन निघून गेली आहे. यामुळे या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे तसेच राहिल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
धारवाड येथील कंपनीच्या ठेकेदाराला काम
सध्या न्यायालयाची स्थगिती हटविण्यात आली असून नवीन निविदा येईपर्यंत या मार्गावर वाहनांना ये-जा करणे मुश्कील बनले होते. महामार्गाची तातडीने डागडुजी करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून तसेच विविध संघटनांकडून आंदोलन करून निवेदनेही देण्यात आली होती. रस्त्याच्या डागडुजीकरणास दोन ते चार दिवसांत सुरुवात करण्यात येणार असून सदर डागडुजी करण्यासाठी धारवाड येथील अर्जुन-वैष्णवी नावाच्या कंपनीच्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे.
सदर महामार्गाचे काम करताना मोठय़ा प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने कामामध्ये व्यत्यय येत आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत सदर मार्ग अवजड वाहनांसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
अनमोड घाट गेल्या दोन वर्षांपासून अधिकृतरित्या बंद असला तरी या मार्गावर आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यातील वाहनांची मोठय़ा प्रमाणावर ये-जा सुरू होती. बुधवारी सकाळी अचानक अवजड वाहनांना बंदीसाठी रामनगर येथे बॅरिकेड्स घातल्याने अनेक वाहने रस्यावरच थांबून होती.
वाहनधारकांची पोलिसांशी हुज्जत
मोलम चेकनाक्यावर कोणत्या कामासाठी मार्ग बंद करण्यात आला आहे, याची अधिकृतरित्या कागदपत्रे नसल्याने अवजड वाहनांना थांबविताना फार अडचणी उद्भवत आहेत. अनेक अवजड वाहनधारक गोवा पोलिसांशी गोवा येथून कर्नाटकात रस्ता बंद असलेली कागदपत्रे दाखवा, अशी विचारणा करून हुज्जत घालत आहेत. पोलिसांकडे मात्र कोणतीही कागदपत्रे नसल्याने वाहनधारकांना समजावून सांगणे मोठी डोकेदुखी बनली आहे. सध्या हा मार्ग बंद करण्यात आल्याने या मार्गावरील हॉटेलचालक व व्यावसायिकांच्या व्यवसायावर पुन्हा विरजण पडले आहे.









