प्रतिनिधी/ बेळगाव
अनधिकृत वसाहतींना ब्रेक लावण्यासाठी बुडाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी मजगाव परिसरातील अनधिकृत लेआऊटमधे कारवाई करून रस्ते व गटारी उखडून काढण्यात आले. या ठिकाणी असलेल्या दोन लेआऊटमध्ये कारवाई राबविण्यात आली.
अनधिकृत लेआऊट्स रोखण्यासाठी बुडाकडून वारंवार कारवाई करण्यात येत आहे. तरीदेखील अनधिकृत लेआऊट करण्याचे प्रकार सुरूच आहेत. पिरनवाडी परिसरातील सर्व्हे क्र. 38 मध्ये अनधिकृत लेआऊट निर्माण करण्यात आले होते. याबाबत बुडाकडे तक्रार आल्याने सदर कारवाई करण्यात आली. मजगाव येथील सर्व्हे क्र. 60/1 आणि 60/2 मधील शेतजमिनीमध्ये लेआऊट निर्माण करण्यात आले होते. या ठिकाणी रस्ते घालून भूखंडांची विक्री करण्यात येत होती. त्यामुळे बुडाने दोन्ही ठिकाणी कारवाई करून लेआऊटमधील रस्ते व गटारी जेसीबीने उखडले. अशा प्रकारे अनधिकृत लेआऊट निर्माण केल्यास कारवाईचा बडगा राबविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमणी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, नगर योजना अधिकारी ए. एस. कांबळे, कार्यकारी अभियंते, साहाय्यक कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ तसेच बुडा कर्मचाऱयांच्या उपस्थितीत ही कारवाई राबविण्यात आली.









