वार्ताहर / उचगाव
गांधीनगर बाजारपेठेतील गडमुडशिंगी हद्दीतील सौ कविता शंकर पंजाबी यांचे अनधिकृत बांधकाम कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने पाडण्यात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरू होती. प्राधिकरणाच्या या कारवाई मुळे परिसरात खळबळ उडाली असुन बेकायदेशीर बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.येथून पुढेही कारवाई चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
जेसीबीच्या साह्याने ही कारवाई झाली. यावेळी संबधित मालकाने कागदपत्रे दाखवून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र प्राधिकरणाने रितसर तीन वेळा नोटीसीद्वारे कळविले असल्याने कारवाई सुरुच राहीली. दरम्यान जेसीबीच्या साहाय्याने बांधकाम पाडण्यात आले असले तरी इमारत मोठी असल्याने ब्रेकर मागविण्यात आले. त्यासाठी कारवाई सायंकाळी पाचपर्यंत थांबविण्यात आली.त्यानंतर पुन्हा कारवाईस सुरुवात होवून बांधकामावर हातोडा पडला.
या कारवाईबाबत नगररचनाकार दिलीप कदम म्हणाले की, तीन वेळा नोटिसा देऊनही संबंधित बांधकाम धारकाने त्याकडे कानाडोळा केला. म्हणून जागेवर जाऊन पंचनामा करून पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाने गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कविता पंजाबी यांच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईस सुरुवात केली. यावेळी बांधकाम धारकाने हुज्जत घातली मात्र अधिकाऱयांनी कारवाई सुरुच ठेवली.
कारवाईच्या वेळी नायब तहसीलदार बिपिन लोकरे आरेखक लक्ष्मण कदम मंडलाधिकारी अर्चना गुळवणी तलाठी महेश सूर्यवंशी संतोष भिऊनगडे आर एन गाढवे आदी उपस्थित होते.
ब्रेकर मागविला
जेसीबीच्या साहाय्याने बांधकाम पाडण्यात आले असले तरी इमारत मोठी असल्याने ब्रेकर मागविण्यात आले.त्यासाठी कारवाई सायंकाळी पाच पर्यंत थांबविण्यात आली.त्यानंतर पुन्हा कारवाईस सुरुवात होवून बांधकामावर हातोडा पडला.
प्राधिकरणाचा बेकायदेशीर बांधकामांना दणका
गांधीनगर विनापरवाना इमारतीवर हातोडा टाकून पाडल्याने एक खळबळ उडाली. प्राधिकरणाने आता उर्वरित बेकायदेशीर बांधकामांना नोटिसा दिल्या आहेत ती बांधकामे पडणार का अशी चर्चा दिवसभर गांधीनगरात होती.