वार्ताहर / कुडाळ
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱया पाचगणी-महाबळेश्वर परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि उत्खननाबाबत ‘तरुण भारत’ने आवाज उठवला आहे. त्यामुळे महसूल विभाग व स्थानिक प्रशासन यंत्रणेचा अंदाधुंदी कारभार चव्हाटय़ावर आला. महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि उत्खननाला सध्या जोर चढू लागला आहे. मात्र याकडे अद्यापही महसूल विभाग आणि प्रशासन संबंधितांवर कोणतीच कारवाई करायला पुढे येत नसल्याने या सर्व प्रकारावर जिल्हा प्रशासनाची चुप्पी का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूमिकेवर आता संशयाची सुई निर्माण होऊ लागली आहे.
पाचगणी परिसरातील टेबल लॅंडचा पायथा पोखरणाऱया मुंबईच्या एका धनिकाने स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून महाबळेश्वरच्या तहसील कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयांना खुश केले आहे. त्यामुळे टेबल लॅंडचा पायथाचं पोखरून मोठा टेबल लँडचा कटडा निकामी करत पाचगणी परिसरात टेबल लँडच्या अवतीभवती राहणाया नागरीवस्तीला व शाळेला कायमस्वरूपी धोक्याची परिस्थिती निर्माण केली आहे. या सर्व घटनांना परखडपणे ‘तरुण भारत’ ने प्रकाश झोतात आणाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक खडबडून जागे झाले, मात्र प्रशासन जाणीव पूर्वक कुंभकर्णाच्या झोपमधून जागे कधी होणार ? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी शेखरसिंह शनिवार-रविवारी थंड हवेच्या ठिकाण व पुस्तकाचे गाव भिलार येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येतात. मात्र महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील रस्त्यालगत असणारी अनाधिकृत बांधकाम व उत्खनन जिल्हा अधिकाऱयांना का दिसत नाहीत. असाही प्रश्न स्थानिक नागरिकांनमधून उपस्थित होऊ लागला आहे. सुट्टीला व थंडगार हवेचा आस्वाद घेण्यासाठी आलिशान हॉटेल्समध्ये अनेक विभागाचे अधिकारी व कर्मचारी भेट देत असतात. मात्र या सर्व अनागोंदी अनधिकृत उत्खनन व बांधकामाची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह किंवा वरिष्ठ अधिकाऱयांना का दिली जात नाही, असा सवाल आता पर्यावरण प्रेमींकडून देखील व्यक्त होऊ लागला आहे.
भिलार, खिंगर, गोडवली, पांगारी, महाबळेश्वर, तापोळा, राजपुरी, पाचगणी परिसरात तायघट अंजुमन इस्लाम स्कूल परिसर तळमळा या ठिकाणी अनाधिकृत उत्खनन व बांधकामाने चांगलेच जोर धरू लागले आहेत. हा सर्व प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून सुध्दा महाबळेश्वर महसूल विभाग आणि नगरपालिका प्रशासन अनधिकृत बांधकामांवर काहीच कारवाई करायला तयार नाही. त्यामुळे आता ज्या अपेक्षा जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्ण केल्या पाहिजे होत्या, त्या केल्या जात नाहीत. निसर्गप्रेमींच्या अपेक्षांचा भंग होऊ लागल्याने महाबळेश्वर-पाचगणीचे सौंदर्य व निसर्ग धोक्यात आले आहे.
महाबळेश्वर-पाचगणीतील अनाधिकृत बांधकामाबाबतच्या परिस्थितीला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा अंकुश नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अशा अनेक तक्रारी व प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत. तक्रारींचा फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात लालफितीतून बाहेर कधी येणार ?, अनधिकृत बांधकाम आणि उत्खननावर फूटपट्टी कधी फिरणार ?, खरे पंचनामे कधी होणार?, कारवाईचा बडगा कधी उगडणार? अशा प्रश्नावल्या पर्यावरण प्रेमी व स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होऊ लागली आहे.









