नगरविकासमंत्र्यांनी घेतला मनपा अधिकाऱयांचा खरपूस समाचार
प्रतिनिधी / बेळगाव
भाग्यनगर परिसरात तीन मजली इमारत बांधकामासाठी परवानगी देण्यात आली असताना सहा मजली बांधकाम करण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. यांच्या निर्दशनास आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या नगरयोजना अधिकाऱयांना धारेवर धरून इमारतीचे बांधकाम होईपर्यत झोपला होता काय? असा प्रश्न उपस्थित केला. शहरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचा आदेशही महापालिका आयुक्तांना बजाविला.
नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. बेळगाव दौऱयावर आले आहेत. शुक्रवारी महापालिका कार्यालयात शहरात राबविण्यात येणाऱया विकासकामांचा आढावा घेतला. शहरात अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात येतात. मात्र याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे भाग्यनगर 9 वा क्रॉस येथील अनधिकृत बांधकामाची तक्रार थेट नगरविकासमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या बांधकामाची चौकशी नगरविकासमंत्र्यांनी बैठकीवेळी केली. या इमारतीला तीन मजलीपर्यंत बांधकाम करण्याची परवानगी दिली असताना सहा मजली बांधकाम कसे झाले? असा जाब मनपा नगरयोजना अधिकाऱयांना विचारला. याबाबत चौकशी करून माहिती देतो, असे अधिकाऱयांनी सांगितले. पण नगरविकासमंत्र्यांनी तुम्ही काय माहिती देणार? माझ्याकडे सर्व माहिती आहे. तुम्ही परवानगी देता आणि दुर्लक्ष करता त्यामुळेच अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. तीन मजली बांधकामासाठी परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्षात इमारतीचे बांधकाम सहा मजली करण्यात आले आहे. तरी तुम्ही गप्प कसे बसला आहात? इतके दिवस झोपा काढत होता का? असा मुद्दा उपस्थित करून नगरयोजना अधिकाऱयांना धारेवर धरले.
सदर इमारतीबाबत नोटीस बजावून कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी सांगितले. पण नगरविकासमंत्री थांबले नाहीत. सदर इमारतीच्या बांधकामाबाबत तातडीने कारवाई करण्याची सूचना केली. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांची यादी दोन दिवसात सादर करण्याचा आदेश बजावला. आणि सर्व अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजावून कारवाई करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना केली.









