निर्बंध घालण्यासाठी महापालिकेने राबविला उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येत आहे. तरीदेखील नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: शाळेशेजारी आणि खुल्या जागेत कचरा टाकला जातो. यावर निर्बंध घालण्यासाठी महापालिकेने उपक्रम हाती घेतले आहेत. अनगोळ शाळा क्र. 34 येथील कचराकुंडी हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
शहराची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम आणि अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील रस्त्याशेजारी व अन्यत्र साचणाऱया कचऱयाची उचल करण्यात येते. कचऱयाचे ढिगारे साचू नयेत याकरिता महापालिकेकडून घरोघरी जाऊन कचरा जमा केला जातो. कचरा घेण्यासाठी नागरिकांकडून वर्षाला 360 रुपये आकारण्यात येत आहेत. व्यावसायिक आस्थापनांकडून हजार रुपयेपर्यंत स्वच्छता शुल्क घेण्यात येते. त्यामुळे घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येते. काही नागरिक आपल्या वेळेत कचरावाहू वाहन आले नसल्याचे सांगून रस्त्याशेजारी किंवा खुल्या जागेत कचरा टाकतात. विशेषत: शाळेशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत असतात. शहराच्या प्रत्येक भागात हीच स्थिती असून, विद्येचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱया शाळेच्या आवारातच कचरा टाकून घाण केली जाते. यामुळे शाळेत शिकणाऱया लहान मुलांनाच अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागतो. इतरत्र कचरा टाकू नये, कचरा घेणाऱया स्वच्छता कामगारांकडे कचरा देण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येते. पण याची दखल घेण्यात येत नाही.
अनगोळ येथील शाळा क्र. 34 समोर कचरा टाकण्यात येत असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. फलक लावून जागृती करूनही याकडे दुर्लक्ष करून कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे महापालिकेने हा ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी मंगळवारी विशेष मोहीम राबविली. आरोग्य विभागाच्यावतीने शाळेसमारील कचऱयाची उचल करून स्वच्छता करण्यात आली. या ठिकाणी औषध फवारणी करून फलक लावण्यात आला. यापुढे या ठिकाणी कचरा टाकण्यात आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे..









