स्मार्ट सिटीची कामे कधी पूर्ण होणार?: नियोजनबद्ध कामे होत नसल्याने तीव्र संताप, सर्किट बॉक्स-फिडर पिलर बॉक्स खुलेच

प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून विकासकामे राबविली जात आहेत. मात्र केवळ रस्ते करणे आणि फुटपाथकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार घडत आहेत. रस्ता करायचा आणि त्यानंतर पुन्हा खोदाई करायची, झाडे तोडायची असे प्रकार केले जात आहेत. शहरातील रस्त्यांच्या विकासाची कामे सुरू आहेत. मात्र ती अर्धवटच आहेत. अनगोळ येथील मुख्य रस्ता केला. मात्र फुटपाथवर असलेल्या केबल्स, विद्युत सर्किट बॉक्स आणि फिडर पिलर बॉक्स खुले आहेत. त्यामुळे फुटपाथ कुचकामी ठरत आहेत. एकूणच सध्या सुरू असलेली कामे संथगतीबरोबरच नियोजनबद्ध नसल्याचे दिसत असून त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी म्हणजे भकास सिटी होणार काय?
कंत्राटदाराला सवड मिळेल तेव्हा काम सुरू करायचे. त्यानंतर अचानक बंद केले तर तिकडे फिरकायचे नाही. गेल्या काही वर्षांपासून काम रखडलेलेच आहे. डेनेजपाईप घालण्यासाठी खणण्यात आलेल्या चरी तशाच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. मध्यंतरी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र फुटपाथचे काम तसेच पडून आहे. फुटपाथ आणि पथदीप यांचा अद्याप पत्ताच नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणजे भकास सिटी होणार काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.

अनगोळ नाका ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंतच्या दुतर्फा फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. पण त्यावरून चालणे कठीण झाले आहे. विद्युत सर्किट बॉक्स आणि फिडर पिलर बॉक्स खुलेच आहेत. चुकून एखाद्याचा स्पर्श झाला तर त्याच्या जीवावर बेतू शकते. फुटपाथची रुंदीदेखील कमी आहे. पेव्हर्सदेखील बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. सायंकाळच्यावेळी तसेच पहाटेच्यावेळी फुटपाथवरून ज्ये÷ नागरिक, वृद्ध चालत जाताना समस्या निर्माण होत आहेत. या रस्त्यावरच हरिमंदिर आहे. त्यामुळे मंदिराकडे जाणाऱया वृद्ध भक्तांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.
तातडीने फुटपाथ पूर्ण करा
रस्त्यावर चालणे अवघड आहे. कारण वाहनचालक जोरदार वाहने चालवत आहेत. त्यामुळे अपघात घडू शकतो. अनगोळ नाका ते धर्मवीर चौक इथपर्यंत काही व्यावसायिक फुटपाथवरच ठाण मांडून आहेत. काही जण चारचाकी व दुचाकी पार्किंग करत आहेत. त्यामुळे देखील अडथळा निर्माण होत आहे. एकूणच अनगोळ मुख्य रस्त्यावरच्या फुटपाथबाबत कंत्राटदाराचे साफ दुर्लक्ष झाले असून तातडीने फुटपाथ पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
धर्मवीर संभाजी चौकात वाहतुकीची कोंडी
धर्मवीर संभाजी चौक ते मराठी शाळेपर्यंत बाजारपेठच आहे. याचबरोबर या ठिकाणी वर्दळही मोठी आहे. दिवसभर आणि रात्रीपर्यंत वर्दळ असते. या रस्त्यावरच दुचाकी, चारचाकीस्वार वाहने पार्किंग करून भाजी तसेच इतर साहित्य खरेदी करत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तेव्हा पार्किंगलाही शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.









