बेळगाव :
अनगोळ येथील मुख्य रस्त्याचे स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेले काम नियोजन शून्य पद्धतीने होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आतापर्यंत कित्येक अपघात घडले आहेत. यात कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय, तर कुणाची गाडी तर कुणाचे डोके फुटून नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अनेक अपघात या रस्त्यावर घडत असल्याने स्मार्ट रोडचे काम हे नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहे. पहिल्याच टप्प्यात असे प्रकार घडल्यानतंर दुसऱया टप्प्याततरी हे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होतील असे वाटत होते. पण दुसऱया टप्प्यातही त्याच परिस्थितीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
दुसऱया टप्प्यातील एक बाजू पूर्ण होत असतानाच रस्त्याच्यामध्ये काही अंतरावर सिमेंट पाईप घालण्याचे काम सुरू आहे आणि यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने या पाईप लाईन घालण्यात आल्या आहेत. पण काही ठिकाणी रस्ता तसाच खणून ठेवण्यात आल्याने त्या खड्डय़ांमध्ये बुधवारी दिवसभर ते रात्रीपर्यंत तब्बल 15 जणांचा अपघात घडला आहे. तर रात्री एकाच खड्डय़ात दोन दुचाकीस्वार पडल्याने ते जखमी झाले. तर अपघातामुळे दोन्ही दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गाडगीळ बस स्थानकापासून ते अनगोळ नाकापर्यंत नवीन ड्रेनेज लाईन घालण्याबरोबरच रस्त्यावर ठिकठिकाणी आडव्या भल्यामोठय़ा चरी खणून त्यामध्ये सिमेंटच्या पाईप घालण्यात येत आहेत. या चरी खणताना फोन, इंटरनेट, पाण्याची पाईपलाईन तसेच वीजवाहिन्या तुटत आहेत.
अनगोळ परिसरात जाण्यासाठी मुख्य रस्ता
अनगोळ नाकापासून चिदंबरनगर, भाग्यनगर, विद्यानगर, उद्यमबाग तसेच अनगोळ गावात प्रवेश करण्यासाठी हा एक मुख्य रस्ता आहे. तसेच वाहतुकीसाठी ही एकच मुख्य रस्ता असल्याकारणाने या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यातच हा रस्ता खडबडीत करण्यात आल्यामुळे वाहन चालवताना मोठीच समस्या निर्माण झाली आहे.
रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
संपूर्ण अनगोळ रस्ता हा चिखलमय झाला आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आणि रस्ता खडबडीत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अपघातानंतर सर्व खड्डय़ांभोवती बॅरिकेड्स
नागरिकांना रात्रीच्यावेळी वाहन चालवताना किंवा चालत येत असताना खणलेल्या खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने नागरिकांना मनस्ताप होतो आहे. आज सकाळपासूनच नागरिकांनी घडलेल्या प्रकारावर आवाज उठवताच खणलेल्या सर्व खड्डय़ांभोवती बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. अनगोळ मुख्य रस्त्यावरील दिवे सुरु ठेवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहेत. तरी संबंधित अधिकाऱयांनी लवकरात लवकर या समस्यांकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.









