हेस्कॉमकडून दुर्लक्ष : ऑनलाईन शिक्षणाचे वाजले बारा
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ परिसरात मागील 7 ते 8 महिन्यांपासून विजेच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. हेस्कॉमकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा अनगोळच्या नागरिकांनी दिला आहे.
अनगोळ येथील मारुती गल्ली, झेरे गल्ली, भेंडिगेरी गल्ली, पाटील गल्ली, तानाजी गल्ली या परिसरात मागील काही महिन्यांपासून वीजपुरवठय़ाचे तीन-तेरा वाजले आहेत. दिवसभरात 10 ते 12 वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. याबाबत लाईनमन तसेच इतर अधिकाऱयांना माहिती देऊनही त्यांच्याकडून अद्याप योग्य ती दखल घेण्यात आलेली नाही.
हेस्कॉमकडून टाळाटाळ नागरिकांनी हेस्कॉमकडे तक्रार केल्यानंतर त्यांना थातुरमातूर उत्तरे दिली जात आहेत. या परिसरातून शेतीसाठी वीजपुरवठा होत असल्याने कोणत्या तरी शेतकऱयाने पंप सुरू करताच ही समस्या येत असल्याचे कारण हेस्कॉमकडून देण्यात येत आहे. यामुळे जाब विचारायचा कोणाला? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने त्यांनाही या समस्येचा फटका बसत आहे.









