प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगर येथे उभारण्यात येणाऱया हॉकी स्टेडियमला ऑलाम्पिक हॉकीपट्टू बंडू पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला बुडाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच अनगोळ भूसंपादनास विरोध करून शेतकऱयांनी केलेल्या आक्षेपावर चर्चा करण्यात आली. 50-50 फॉर्म्युल्यानुसार योजना राबविण्यासाठी शेतकऱयांशी पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बुडाची सर्वसाधारण सभा बुडाचे अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. सदर बैठक रद्द होईल अशी चर्चा होती. पण शुक्रवारी दुपारी 12 वाजता बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीच्या अजेंडय़ावर तब्बल 65 विषय होते. त्यामुळे जंबो अजेंडय़ावर दिवसभर बैठक चालेल अशी अपेक्षा होती. पण काही विषयांवर चर्चा करून दुपारी दीड वाजता बैठक आटोपती घेण्यात आली. मात्र झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. हॉकी संघटनेच्या वतीने रामतीर्थनगर येथे हॉकी स्टेडियमची उभारणी करण्यात येणार आहे. सदर स्टेडियमला बंडू पाटील यांचे नाव देण्याची मागणी बुडाकडे करण्यात आली होती. त्यामुळे या विषयावर चर्चा करून हॉकी स्टेडियमला हॉकीपट्टू बंडू पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनगोळ येथील शेतजमीन संपादित करून वसाहत योजना राबविण्यासाठी बुडाने नोटिसा बजावल्या होत्या पण याला आक्षेप घेऊन शेतकऱयांनी भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. भूसंपादन प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करून बुडाकडे व जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन दिले होते. त्याचप्रमाणे बुडाकडे लेखी आक्षेप दाखल करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱयांच्या आक्षेपावर बुडाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर योजना राबविण्यास शेतकऱयांनी विरोध दर्शविला असल्याने कोणता निर्णय घ्यायचा यावर चर्चा झाली. ही योजना राबविण्यासाठी बुडाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे 50-50 तत्वावर शेतकऱयांकडून संमती घेण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱयांशी चर्चा करून संमती घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. योजना राबविण्याकरीता संमती घेण्यासाठी शेतकऱयांचे मन परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे अनगोळ भूसंपादनाबाबत ठोस निर्णय झाला नाही.
तसेच जागेच्या विनियोगात बदल करणे, सिंगल लेआऊट आणि खासगी लेआऊटना मंजुरी देणे त्याचप्रमाणे कुमारस्वामी लेआऊट येथे नाल्याचे बांधकाम, रामतीर्थनगर येथील मुख्य रस्त्याचा विकास अशा विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी बुडाच्या बैठकीला आमदार अनिल बेनके, बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., तसेच बुडाचे नगरयोजना अधिकारी ए. एस. कांबळे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, पोलीस प्रमुख, पायाभूत सुविधा खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









