आज पडली भरण्याचा होणार कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे भाविक मोठय़ा संख्येने आहेत. प्रत्येक वषी हे भाविक सौंदत्ती डोंगराला जात असतात. मात्र कोरोनामुळे अनेकांनी ही यात्रा रद्द केली होती. मात्र अनगोळचे भाविक यात्रा करण्यासाठी सौंदत्तीला रवाना झाले असून मंगळवार दि. 16 रोजी पडली भरण्याचा कार्यक्रम डोंगरावर होणार आहे.
ग्रामस्थांनी वाजतगाजत या भाविकांना यात्रेसाठी रवाना केले. यावेळी भंडाऱयाची उधळण तसेच रेणुका देवीचा जयजयकार करत भाविक रवाना झाले. हणम्मण्णावर गल्ली, कलेमश्वर मंदिर, मरगाई मंदिर, संतमीरा रोडमार्गे हे भाविक सौंदत्तीला रवाना झाले. यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या हस्ते देवीच्या रथाची पूजा करण्यात आली.
त्यानंतर हे भाविक भंडारा उधळत डोंगराकडे निघाले. शुक्रवार दि. 19 रोजी दुपारी 4 वाजता अनगोळ येथे मळय़ाची जत्रा करण्यात येणार आहे. त्याआधी हे भाविक पुन्हा अनगोळला येणार आहेत. तरी भक्तांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेणुकादेवी मंदिर ट्रस्टने केले आहे.









