उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
अध्यापक विकास उपक्रमामधून राज्यातील अध्यापकांना नवनवीन अध्यापनाच्या पद्धती अवगत होतात. त्यामुळे अध्यापन विकास उपक्रम अध्यापकांसाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी केले. ते उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य उच्च शिक्षण समिती यांनी पर्वरीत आयोजित केलेल्या अध्यापक विकास उपक्रमांतर्गत ‘गट आधारित शिक्षण पद्धती-एक सक्रिय शिक्षण धोरण’ या उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होते.
अध्यापक विकास उपक्रमाची सुऊवात प्रमुख पाहुणे म्हणून एडटेक सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रा. ब्रिजू थंकांचन यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभाने झाली. यावेळी प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपक्रमाच्या समन्वयक साहाय्यक प्राध्यापिका वंदना नाईक यांनी प्रा. ब्रिजू थंकांचन यांचा परिचय करून दिला. प्रा.विठ्ठल तिळवी यांनी आभार मानले.
यावेळी आयुर्वेद, दंत, वैद्यक, होमिओपॅथी, अभियांत्रिकी आणि सामान्य शिक्षण यांसारख्या क्षेत्रातील प्राध्यापकांनी या अध्यापक विकास उपक्रमामध्ये हजेरी लावली.
नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती
नवनवीन अध्यापन पद्धती शिकल्यामुळे राज्यातील अध्यापक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या निर्देशांचे पालन करण्यास सक्षम होतील. यशिवाय हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्यामुळे या उपक्रमात सहभागी झालेले शिक्षक नवनव्या अध्यापन पद्धती वापरून नवीन अभ्यासक्रमही तयार करू शकतात, असे मत लोलयेकर यांनी व्यक्त केले.









