वॉशिंग्टन
अध्यक्ष बदल होण्याच्या काळात एका व्यक्तीला मृत्यूदंड दिला जाण्याची दुर्मिळ घटना घडली आहे. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रशासनाने शुक्रवारी ब्रँडन बर्नार्ड या व्यक्तीला विषाचे इंजक्शन देऊन मृत्यूदंड दिला. मावळत्या अध्यक्षांच्या शेवटच्या प्रशासकीय महिन्यामध्ये सहसा असे होत नाही. असे मृत्यूदंड देण्याचे उत्तरदायित्व नव्या अध्यक्षांवर सोडण्याची पद्धत आहे. पण ट्रंप प्रशासनाने या पद्धतीला फाटा देऊन मृत्यूदंडाच्या शिक्षेचे क्रियान्वयन केले. गेल्या 130 वर्षांमध्ये प्रथम असे घडत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेत फासावर लटकवून मृत्यूदंड देण्याची प्रथा बऱयाच प्रांतांमध्ये नाही. त्याऐवजी कमी यातनादायक असे विषाचे इंजक्शन देऊन शिक्षेचे क्रियान्वयन केले जाते. बर्नार्ड याच्यावर टेक्सास प्रांतात रक्तपात केल्याचा आरोप होता. त्याला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्याच्याप्रमाणेच अन्य 9 जणांनाही हीच शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्यापैकी 5 जणांवर आतापर्यंत या शिक्षेचे क्रियान्वयन झाले आहे.









