5 राज्यांमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे मंथन
नवी दिल्ली
5 राज्यामंध्ये झालेल्या दारुण पराभवावर मंथन करण्यासाठी आयोजित काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रविवारी पार पडली आहे. या बैठकीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी केले असून बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी-वड्रा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सामील झाले. या बैठकीत पक्षाचा असंतुष्ट गटही सामील झाल्याने पक्ष संघटनात्मक निवडणूक तसेच अध्यक्षपदाचा मुद्दा ऐरणीवर राहिला. देशभरातील निवडणुकांमध्ये सातत्याने कमी होत चाललेले बळ पाहता काँग्रेसवर आता नवा अध्यक्ष नेमण्यासाठी दबाव तयार झाल्याचे सांगण्यात येते. विशेषकरून पंजाबमध्ये राहुल गांधी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती, तर प्रियंका गांधी-वड्रा यांनी उत्तरप्रदेशात काँग्रेसचे नेतृत्व केले होते. तरीही दोन्ही राज्यांमध्ये पक्षाचा नामुष्कीजनक पराभव झाल्याने त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी प्रकृती अस्वास्थामुळे सामील झाले नाहीत. तर बैठकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेसची धुरा हाती घ्यावी असे उद्गार काढले आहेत. पराभवाला घाबरून जाण्याची गरज नाही. भाजप निवडणुकीच्या काळात हिंदू-मुस्लीम राजकारण करते आणि बेरोजगारी, महागाई सारख्या मुद्दय़ांना मागे सारत असल्याचे म्हणत गेहलोत यांनी पक्षाच्या पराभवासाठी राहुल अन् प्रियंका जबाबदार नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यास पक्ष एकजूट राहणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
राहुल गांधींचे समर्थन
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान काँग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी राहुल यांना अध्यक्ष करण्यासंबंधी घोषणाबाजी केली आहे. तसेच त्यांनी प्रियंका वड्रा यांच्या समर्थनार्थही नारे दिले आहेत. तत्पूर्वी पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्यासंबंधीचे वृत्त फेटाळले आहे.
असंतुष्ट सदस्यही सामील
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यापासून प्रचारव्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका राहिलेले सर्व नेते उपस्थित होते. काँग्रेस नेतृत्वावर असंतुष्ट नेत्यांचा समूह जी-23 चे सदस्य गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा देखील कार्यकारिणीचे सदस्य आहेत. निवडणुकीतील दारुण पराभवामुळे पक्षांतर्गत रोष देखील आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या 3 वर्षांनंतर देखील काँग्रेसला नवा अध्यक्ष निवडता आलेला नाही. सोनिया गांधी या मागील 3 वर्षांपासून अंतरिम अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
पक्ष संघटनात्मक निवडणुकीची मागणी
याचदरम्यान पक्षात आत्ममंथनाचा आवाज जोर पकडू लागला आहे. पक्षनेतृत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकावे. मोदींचे बलस्थान काय आहे हे पाहणे गरजेचे असल्याचे पंजाबमधील काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी म्हटले होते. तर खासदार शशी थरूर यांनी पक्षाला प्रासंगिक म्हणून कायम राहायचे असल्यास संघटनात्मक नेतृत्वात बदल टाळला जाऊ शकत नसल्याचे नमूद केले आहे. तर जी-23 समुहाच्या नेत्यांकडून मुकुल वासनिक किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांना अध्यक्षपद देण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे.









