प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी अखेर रविवारी रात्री आपल्या पदाची सूत्रे सोडली. त्यानंतर त्या जळगावला रवाना झाल्या. शुक्रवारी डॉ. गजभिये यांची जळगावला बदली करण्यात आली होती. त्या संदर्भातील शासनाचे आदेश पारित झाले होते. मात्र गेले दोन दिवस या बदलीवरून संभ्रम निर्माण झाला होता. डॉ. गजभिये यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची निवड करण्यात आली होती. मात्र आता त्यांची ही बदली रद्द झाल्याचे सांगण्यात येते. रविवारी रात्री डॉ. गजभिये यांनी भूलतजज्ञ डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे हंगामी अधिष्ठाता पदाची सूत्रे सुपूर्त केली.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. गजभिये सोमवारी जळगाव येथील पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. हंगामी पदभार स्वीकारलेल्या डॉ. आरती घोरपडे या शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टर आहेत. नवीन पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्त होईपर्यंत डॉ. घोरपडे यांना हंगामी अधिष्ठाता पदाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.








