सुवर्णविधानसौधपासून एक कि.मी. पर्यंत जमावबंदी
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवार दि. 19 डिसेंबरपासून सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी 5 हजार पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 12 डिसेंबरपासून सुवर्ण विधानसौधपासून एक कि. मी. अंतरापर्यंत जमावबंदीचा आदेश दिला आहे.
अधिवेशनाच्या काळात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी परजिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात कुमक मागविण्यात आली आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तात्पुरते टाऊनशिप उभारण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमेवर 26 चेकपोस्ट उभारण्यात आले असून तपासणी करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान अतिरिक्त महापोलीस संचालक अलोककुमार रविवारी बेळगावला येणार आहेत.
अधिवेशन बंदोबस्तासाठी सहा एसपी, 11 एसपी, 43 डीएसपी, 95 पीआय, 241 पीएसआय, 298 एएसआय, 2829 हवालदार व पोलीस, राज्य राखीव दलाचे 800 जवान, सीएआरचे 170 जवान, क्युआरटी टीमचे 80 जवान, वायरलेस विभागासाठी 100 कर्मचारी, 35 जणांचे गरुडा पथक, 130 जणांचे एएससी पथक तैनात करण्यात येणार आहे.
परजिल्ह्यांतून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसाठी शिंदोळीजवळ उभारण्यात आलेले टाऊनशिप, मुक्तीमठ, कंग्राळी खुर्द जवळील पोलीस ट्रेनिंग सेंटर, मच्छे येथील केएसआरपी विभाग, सांबरा एटीएस, वीरभद्रेश्वर मंदिर, डीएआर, पीटीएस विभाग, बंटर भवन, बाबू जगजीवन हॉल, रयत भवन, गुजरात भवन, चिंडक हॉल, शहापूर मारुती मंदिर, पंत महाराज कल्याण मंटप व पोलीस गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 4802 हून अधिक पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.
बॉक्स
आंदोलनांसाठी 62 अर्ज
अधिवेशनकाळात अग्निशमन दल, 12 रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. सुवर्णविधानसौध परिसरात 62 वेगवेगळ्या संघटनांची आंदोलने होणार आहेत. यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज दिले आहेत.









