खोल्यांची चाचपणी करून दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची सूचना : आरोग्य विभागातील महसूल निरीक्षकांवर जबाबदारी
प्रतिनिधी /बेळगाव
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हॉटेल ओनर्स असोसिएशनची बैठक घेऊन विविध सूचना करण्यात आल्या. त्यानंतर लागलीच महापालिकेने हॉटेलांचा सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक हॉटेलची पाहणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागातील महसूल निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.
नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी होत असतात. पण आता महिनाभर आधीच मनपाचे कर्मचारी अधिवेशनाच्या तयारीत गुंतल्याने सर्वसामान्य नागरिकांना मनपा कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. हिवाळी अधिवेशन 12 डिसेंबरपासून भरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल, लॉज आणि मंगल कार्यालये राखीव ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याकरिता गुरुवारी हॉटेल चालक-मालक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच शुक्रवारपासून महापालिकेने हॉटेल व लॉजची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेचे अधिकारी हॉटेलची पाहणी करून खोल्या राखीव ठेवण्याची सूचना करीत आहेत. तसेच दुरुस्तीची कामे किंवा अन्य कामे असल्यास अधिवेशनापूर्वी पूर्ण करून घ्यावीत, अशी सूचना हॉटेल व्यवस्थापनाला करीत आहेत.
शहरात 75 हॉटेल असून सर्व हॉटेलना भेटी देऊन किती खोल्या आहेत? सुस्थितीत आहेत की नाहीत? याची चाचपणी करण्यात येत आहे. या कामाची जबाबदारी आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांकडे सोपविली असल्याने आता स्वच्छतेच्या कामावर परिणाम होण्याची शक्मयता आहे.









