– शरद पवार, उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दुसरी भेट, – राजकीय चर्चांना उधाण
प्रतिनिधी/मुंबई
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि राऊत यांच्यात बैठक झाली. यानंतर राऊत थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. या उभयांतांमध्येही काही वेळ चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच ही भेट असल्याची चर्चा होत आहे.
एकीकडे कोविडचे संकट तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पदोन्नतीच्या आरक्षणाबाबतही महाविकास आघाडीत मतभेद आहेत. त्यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर अनिल परब आणि रवींद्र वायकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने भाजपबरोबर जुळवून घेण्याचे पत्रच मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले आहे. अशा अडचणीत असलेल्या ठाकरे यांना कोंडीत गाठण्याची संधी विरोधकांना द्यायची नाही, यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसात आटोपण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारने आखले. मात्र या दोन दिवसांत एक दिवस तर शोकप्रस्तावात जाणार आहे. राहिलेल्या एका दिवसात विरोधक कितपत साथ देतात यावरच किती कामकाज होईल हे अवलंबून आहे. मात्र सध्याचे राजकीय संबंध लक्षात घेता भाजप जुळवून घेण्याची शक्यता कमीच आहे. मग अधिवेशनात काहीच कामकाज झाले नाही याचे खापर सरकारवर फुटू नये यासाठी काय चाल खेळता येईल याचे आराखडे बांधले जात असावेत, यासाठी या बैठका सुरू असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.








