उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची अधिकाऱयांना सूचना : कोविड नियंत्रण कमिटीची स्थापना : बिम्सच्या कारभारामध्ये सुधारणा करण्याची सक्त ताकीद
प्रतिनिधी / बेळगाव
रेमडेसिवीर अवैधरीत्या व अधिक दराने विक्री करणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई करा, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अधिकाऱयांना दिली आहे. कोरोनाच्या उपाययोजनेसाठी प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण करावी. कोणत्याही प्रकारे रुग्णांवर उपचार कमी पडू देऊ नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पंचायतच्या सभागृहात कोविड नियंत्रण समितीची स्थापना करून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना सक्त ताकीद दिली आहे. जिह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मोठय़ा प्रमाणात उपलब्ध केले जातील. ते रुग्णांवर उपचारासाठी वापरणे गरजेचे आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा त्यांच्यावर अधिक नजर ठेवा, असे त्यांनी सांगितले.
काळाबाजार करणाऱयांवर तसेच अधिक दराने विक्री करणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी एक पथक नेमा. त्या पथकाला सर्व अधिकार देऊन कारवाई करण्याचे अधिकार देण्याची सूचनादेखील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा उपाययोजना व औषधे पुरविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयात उपचार मिळाले तर सर्वसामान्य जनता खासगी रुग्णालयांकडे वळणार नाही. तेव्हा अधिकाऱयांनी त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे
आहे.
बिम्सच्या कामगिरीत सुधारणा करा
कोविड रुग्ण बिम्स हॉस्पिटलकडे येण्याऐवजी खासगी रुग्णालयांकडे का वळत आहेत? असा प्रश्न उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांना केला. सरकारने सर्व सुविधा दिल्या आहेत. पण बिम्समध्ये कोणत्याच सुविधा नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. सर्वसामान्य जनता वैतागली आहे. तेव्हा बिम्सच्या कारभारात सुधारणा करा, अशी सक्त ताकीद डॉ. विनय दास्तीकोप यांना दिली आहे.
कोरोनाच्या या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय कर्मचारी व रुग्णवाहिका व इतर उपकरणे तयार ठेवा, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्टपणे सांगितले आहे. कोरोनाच्या काळात काम करण्यासाठी महसूल, पोलीस व आरोग्य विभागातील अधिकाऱयांची एक समिती नेमून त्या सर्वांनी समन्वयाने काम केले पाहिजे. हा काळ अत्यंत कठीण आहे. प्रत्येकाला मदत करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा त्याचा अधिकाऱयांनी विचार करून उपचारासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
मंत्री उमेश कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कमिटी
मंत्री उमेश कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली कोविड नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिह्यातील सर्व आमदार सदस्य राहणार आहेत. या सर्वांनी मिळून कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे.
आरोग्य विभागाला तसेच इतर विभागांना वेळोवेळी सूचना करून त्यांच्या कामामध्ये सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. अनेक जण या काळात गैरप्रकार करत आहेत. औषध विक्रीमध्येही गैरप्रकार होत आहे. तेव्हा त्यांच्यावर अधिकाऱयांनी करडी नजर ठेवणे महत्त्वाचे असून सर्वसामान्य जनतेला उपचार कसे मिळतील याकडे लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार इराण्णा कडाडी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.