वृत्तसंस्था/ मुंबई
अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती वर्ष 2021 मध्ये 3.15 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. याचदरम्यान दान, गुंतवणूकीत आघाडीवर असणारे प्रसिद्ध व्यावसायिक अझीम प्रेमजी यांनी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिकची कमाई केली आहे. अशी माहिती ब्लूमबर्गच्या अहवालानुसार देण्यात आली आहे.
यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती 6.81 लाख कोटी रुपये राहिली आहे. संपूर्ण वर्षभरात त्यांची कमाई ही 98,800 कोटी रुपयांनी वधारली आहे, तर गौतम अदानी यांनी 3.15 लाख कोटी कमाई केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 5.72 लाख कोटी रुपये राहिली आहे. जागतिक यादीत मुकेश अंबानी 12 तर अदानी यांचा नंबर 14 व्या स्थानी श्रीमंतांच्या यादीत समावेश राहिला आहे.
पहिल्या 10 मध्ये भारतीय नाही
जगातील पहिल्या दहामध्ये अब्जावधी व्यावसायिकांच्या यादीत कोणत्याही भारतीयांचा समावेश नाही. अदानींच्या एकूण 6 लिस्टेड कंपन्या आहेत. त्यांनी वर्ष 2021 मध्ये गुंतवणूकदारांना लाभ दिला आहे. अदानी एन्टरप्राईजेसच्या समभागांनी 2.45 पट परतावा दिला आहे.
रिलायन्सकडून कमी परतावा
चालू वर्षात मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी 18.6 टक्के परतावा दिला असून बीएसई सेन्सेक्सने 21 टक्के फायदा करुन दिला आहे. म्हणजे सेन्सेक्समधून कमी परतावा रिलायन्सने दिला आहे.
अझीम पेमजींची संपत्ती 3.13 लाख कोटीवर
अझीम प्रेमजी यांची संपत्ती 3.13 लाख कोटी रुपयावर राहिली आहे. यांनी वर्षभरात1.20 लाख कोटी रुपयाची कमाई केली आहे. डिमार्टचे प्रमुख व गुंतवणूकदार आर. के. दमानी यांनी चालू वर्षात 9.51 अब्ज डॉलर कमविले असून त्यांची संपत्ती 1.85 लाख कोटी रुपयावर राहिली आहे.
विप्रोने दिला 84 टक्के फायदा ः अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रोचे समभाग चालू वर्षात 84 टक्क्यांचा फायदा गुंतवणूकदारांना करुन दिला आहे. दमानीच्या अवेन्यू सुपरमार्टने 66 टक्के इतका परतावा दिला आहे. एचसीएल टेक शिव नाडर यांची संपत्ती 2.47 लाख कोटी रुपयावर राहिली आहे. यामध्ये 63,000 कोटी रुपयाची वाढ राहिली आहे. यात समभाग 39 टक्के वर्षात वधारले आहेत.









