राजा दशरथाला पुत्र नव्हता. त्यामुळे त्या वृद्ध मातापित्यांचा शापच त्याला वरदान झाले. रावण हा राक्षसांचा राजा. तो शिवभक्त होता. विद्वान होता. पण फारच अहंकारी होता. तो देवांना सळो की पळो करून सोडी. तेव्हा सारे देव भगवान विष्णूकडे येऊन त्यांना या त्रासातून सुटका करण्याची विनंती करीत. यावेळीही त्रस्त देव विष्णुकडे मदतीची याचना करीत आले. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ‘रावणाला ठार करण्यासाठी मी दशरथापोटी जन्माला येईन.’ त्यानुसार ‘श्रीराम’ म्हणून त्यांनी दशरथापोटी जन्म घेतला. दशरथाला राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चार मुलगे झाले. सर्वांनी उत्तम विद्याभ्यास केला. एकदा विश्वामित्र ऋषी राजा दशरथाकडे त्याचे पुत्र राम व लक्ष्मण यांना यज्ञाच्या संरक्षणासाठी आपल्या आश्रमात नेण्यासाठी आले. प्रथम खूप आढेवेढे घेऊन दशरथाने वसि÷ ऋषिंच्या सांगण्यावरून त्या दोघांना विश्वामित्रांबरोबर पाठवले. त्या कुमारवयातही श्रीराम आणि लक्ष्मण यांनी मोठा पराक्रम दाखवून यज्ञ संरक्षण केले. खरे म्हणजे राम हा दशरथाचा जीव की प्राण होता. कारण रामासारखा बहुगुणी पुत्र त्याला उतारवयात झाला होता. त्यामुळे रामाविषयीच्या त्याच्या भावना नाजूक असणे स्वाभाविक होते. तरीही राजाने आपण अयोध्येचे राजे आहोत हे भान सोडायला नको होते. राजा जरी कुटुंबवत्सल असला, तरी तो आधी ‘प्रजापालक’ असतो. महषी विश्वामित्र त्याचेच प्रजाजन होते. तसेच ते स्वतःसाठी काहीच मागत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने शेवटी राम-लक्ष्मणाला विश्वामित्रांच्या हवाली केले. कारण रघुवंशीय राजांची कुणालाही विन्मुख पाठवण्याची परंपरा नव्हती. तसेच राजाने वचनाचा भंग करणे म्हणजे ‘कुळाचा सर्वनाश अटळ’ याची जाणीव विश्वामित्रांनी राजाला करून दिली. तेव्हा कुठे दशरथाने दोन्ही पुत्रांना ऋषींच्या हवाली केले. याच काळात विश्वामित्रांनी रामाला ‘बला आणि अतिबला’ या विद्यांचे ज्ञान दिले. ‘बला’ म्हणजे उत्साह व बल यांची वृद्धी, शत्रूचे शस्त्राघात सहन करण्याची शक्ती. तसेच क्षुधा आणि तृष्णा यांची बाधा न होणे. तर ‘अतिबला’ म्हणजे शत्रूंची दृष्टी, मन, देह, कर्म ही स्खलित होणे आणि आपले शस्त्रादी उपाय अमोघ ठरणे होय. यावरून या विद्यांचे महत्त्व लक्षात येईल. त्यापुढे श्रीरामचंद्रांनी स्वतःच्या गुणांनी आणि पराक्रमाने अनेकांचा उद्धार केला. अनेकांना संकटातून मुक्त केले. पुढील कथांमधून यथावकाश आपण ते जाणून घेणारच आहोत.
Previous Articleराहुल यांनी घेतला मासेमारीचा आनंद
Next Article व्यापाऱयांचा ‘भारत बंद’
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








