इस्रायलकडून निर्मिती – लडाखमध्ये चीनच्या हालचालींवर नजर ठेवणार
वृत्तसंस्था / लेह
भारतीय सैन्याला इस्रायलकडून निर्मित अत्याधुनिक हेरॉन ड्रोन प्राप्त झाले आहेत. या ड्रोन्समुळे सैन्याला लडाख सेक्टरमधील दुर्गम भागांमध्ये नजर ठेवण्यास मदत होणार आहे. विशेषकरून चिनी सैन्याच्या हालचाली आता छुप्या राहणार नाहीत. हे ड्रोन भारताला यापूर्वीच मिळणार होते, पण कोरोनामुळे ते उपलब्ध होण्यास काही महिन्यांचा विलंब झाला होता.
हेरॉन ड्रोन पूर्व लडाख क्षेत्रात टेहळणीसाठी तैनात केले जात आहेत. हे सर्व ड्रोन ऑपरेशनल असून पूर्वी उपलब्ध याच शेणीतील ड्रोनपेक्षा अधिक कार्यक्षम आहेत. इस्रायलकडून निर्मित या ड्रोन्समध्ये कॅमेरे, सेंसर्स आणि रडार उच्च क्षमतेचे आहेत. भारतीय सैन्याने 4 हेरॉन ड्रोन्स लडाख सेक्टरमध्ये तैनात केल्याने चीनच्या प्रत्येक हालचालीची माहिती भारतीय सैन्य आणि गुप्तचर यंत्रणांना मिळत राहणार आहे.
एप्रिल 2020 मध्ये चीनसोबत गलवान येथे झालेल्या संघर्षानंतर भारतीय सैन्याने लडाखमध्ये सैनिक, शस्त्रास्त्रs, विमाने, क्षेपणास्त्रांची संख्या वाढविली होती. देखरेखीसाठी उपग्रहांची मदत घेण्यात येत होती. पण आता ड्रोन्स मिळाल्याने टेहळणीमध्ये अत्यंत अधिक मदत होणार आहे. हे चारही ड्रोन्स लेहमध्ये पोहोचल्याचे सांगण्यात आले.

अँटीजॅमिंग तंत्रज्ञानाने युक्त
इस्रायलकडून मिळालेले हे चार हेरॉन ड्रोन्स अत्याधुनिक आहेत. भारतीय सैन्याकडे असलेल्या सर्व ड्रोन्सच्या तुलनेत यांची शक्ती, क्षमता, उड्डाणाचा कालावधी सर्वच खूप अधिक आहे. सर्वात विशेष म्हणजे या ड्रोन्सना कुठल्याही प्रकारे जॅम करता येऊ शकत नाही. म्हणजेच यात अँटीजॅमिंग तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे ड्रोन्स पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आपत्कालीन आर्थिक शक्तीच्या अंतर्गत मागविण्यात आले आहेत. हेरॉन ड्रोन्स इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने तयार केले असून ते मीडियम अल्टीटय़ट लाँग एंडय़ोरेंस अनमॅन्ड एरियल व्हीकल आहे.
52 तासांपर्यंत उड्डाणाची क्षमता
हेरॉन ड्रोन एकाचवेळी 52 तासांपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. हा ड्रोन जमिनीपासून 35 हजार फूट म्हणजेच 10.5 किलोमीटरच्या उंचीवर उड्डाण करतो. हा ड्रोन नियंत्रित करण्यासाठी जमिनीवर एक ग्राऊंड स्टेशन निर्माण केले जाते, ज्यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम असते.
नजरेतून काहीच सुटणार नाही
हेरॉन ड्रोनमध्ये अनेक प्रकारचे सेंसर्स आणि कॅमेरे बसविण्यात आले आहेत. थर्मोग्राफिक कॅमेरा म्हणजेच इन्फ्रारेड कॅमेरा असून तो रात्री किंवा काळोखात दृश्य टिपण्यास मदत करतो. याचबरोबर व्हिजिबल लाईट एअरबोर्न ग्राऊंड सर्व्हिलास दिवसाच्या उजेडातील छायाचित्रे टिपते. तसेच यात इंटेलिजेन्स सिस्टीमसमवेत अनेक रडार सिस्टीम समाविष्ट आहेत. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे तो आकाशातूनच टारगेट लॉक करत त्याचा अचूक ठावठिकाणा आर्टिलरी टँक किंवा इन्फ्रारेड सीकर मिसाईलला देऊ शकतो.
याची कम्युनिकेशन सिस्टीम थेटपणे ग्राऊंड स्टेशनच्या संपर्कात राहते. याचबरोबर याच्या संचार प्रणालीला उपग्रहाद्वारे देखील लिंक केले जाऊ शकते. याच्या नेव्हिगेशनसाठी प्री-प्रोग्राम्ड फुली ऑटोमॅटीक नेव्हिगेशनला चालविले जाऊ शकते, किंवा मॅन्युअली रिमोटद्वारे त्याला नेव्हिगेट करता येते. याचे एकूण वजन 250 किलोग्रॅम आहे.









