तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत होणार उपचार
प्रतिनिधी/ पणजी
अतिशय गंभीर असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना आता बांबोळी येथील गोवा मेडीकल कॉलेज (गोमेकॉ) मध्ये दाखल करून त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उपचार पेले जातील असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. अतिशय गंभीर रुग्णांसाठी गोमेकॉत 145, 146 व 147 हे तीन वॉर्ड राखून ठेवण्यात आले आहे. फोंडा, मडगाव येथील हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत, त्यात अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांना आता गोमेकॉत स्तलांतरीत करण्यात येणार असल्याचेही विश्वजीत राणे यांनी सांगितले.
काल शुक्रवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आरोग्य सचिव निला मोहनन, डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. जोस डिसा व इतर मान्यवर उपस्थित होते.
मडगाव येथील इएसआय हॉस्पिटल व फोंडा येथील जिल्हा हॉस्पिटल ही दोन्ही हॉस्पिटले कोरोना बाधीत रुग्णांसाठी असली तरी या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असलेले व ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांच्यावर उपचार केले जातील. राज्यात पहिल्यांदाज दोन कोरोना बाधीत रुग्णांवर केलेला प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली असून दोन्ही रुग्णांचा रीपोर्ट नेगेटीव्ह आला आहे. असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
राज्यात आत्तापर्यंत 10 हजार 494 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यातील 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधीत झालेल्या रुग्णांमध्ये 96 टक्के रुग्ण हे कोरोना आजाराची लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. अतिशय गंभीर असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांवर व्यवस्थित उपचार व्हावे म्हणून अशा रुग्णांसाठी गोमेकॉत स्वतंत्र वॉर्ड राखून ठेवण्याचे सरकारने ठरविले आहे. इतर दोन्ही हॉस्पिटलमध्ये अतिशय गंभीर असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना गोमेकॉत हलविले जाईल. गोमेकॉत राखीव वॉर्डमध्ये असलेले तज्ञ डॉक्टर तसेच त्या ठिकाणी असलेल्या सुविधामुळे या रुग्णांना आजारातून लवकर बरे होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी सगळेच रुग्णं हे अतीगंभीर रुग्ण नसतात. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांना गोमेकॉत भरती करण्यापूर्वी त्यांची ऍन्टीजन टेस्ट करणे बंधनकारक राहील. हाऊसींग सोसायटीमध्ये होम क्वारंटाईन पेलेल्यांनी घराबाहेर पडल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिला आहे.









