प्रतिनिधी / बेळगाव :
पदार्थ आवडते म्हणून भरपूर खाणे किंवा डायटच्या नावाखाली भूक मारणे, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आपले शरीर आणि मन आपल्याला भूक आणि तहान लागली आहे याची जाणीव करून देते. ती ओळखून आपण आहार घ्यायला हवा, असे मत आयुर्वेदिक तज्ञ डॉ. ऋचा नाईक यांनी व्यक्त केले.
टिळकवाडी, अनगोळ नाका येथील स्वयंभू श्रीगणेश मंदिरच्यावतीने महिलांसाठी गुरुवारी सायंकाळी तिळगूळ समारंभ पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्त्या या नात्याने त्या बोलत होत्या. व्यासपीठावर दीपा दीपक प्रभू व मनीषा सुभेदार उपस्थित होत्या. डॉ. नाईक म्हणाल्या, भारतीय आहार पद्धत ही सर्वोत्तम आहे. आपल्या सणावाराला आणि परंपरांमध्ये त्या दिवशीसाठी विशिष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे, ती अत्यंत योग्य आहे. आज चीज, पनीर असे जड पदार्थ आपण खात आहोत. बेळगावच्या हवेसाठी हे पदार्थ अनुरूप नाहीत. अशा पदार्थांचे सेवन अधेमधे चालू शकते. परंतु, आपला जो पूर्वापार पौस्टिक आहार आहे तोच योग्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी दीपा प्रभू व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना दीपा प्रभू यांनी स्वयंभू गणेश मंदिराचे कार्य समाजासाठी उपयुक्त आहे. हे मंदिर महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे, असे सांगून दर महिन्याला महिलांसाठी कार्यक्रम करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी कॉम्रेड अरुणा असफ अली पुरस्कार मिळाल्याबद्दल तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा सुलभा भोसले यांनी शाल, भेटवस्तू व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना मनीषा सुभेदार यांनी पत्रकार एकटा काहीच करू शकत नाही. त्यामुळे आजपर्यंत मिळालेल्या सर्वच पुरस्कारांमध्ये तरुण भारत परिवाराचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे सांगितले. तर जयश्री पाटील यांनी डॉ. नाईक यांचा तर रेणुका कदम यांनी दीपा प्रभू यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन सुधीर घोडके यांनी केले.
याप्रसंगी मनीषा जाधव, रेणुका कदम, रेणुका सारंग, अनुराधा गवळी, सुगंधा पाटील, रत्ना गवळी, सविता जोशिलकर, निर्मला शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराच्या व्यवस्थापन मंडळासह सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.