बेंगळूर/प्रतिनिधी
मान्सून संपूनही राज्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महिन्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे आले, कांदा, भुईमूग, सुपारी, तूर, कापूस व मका आदी पिके शेतात सडत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोना आणि पाऊस यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणितच चुकलं आहे.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार यंदा ७५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून यंदा अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात पेरणी झाली आहे. सन २००७ मध्ये ७१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावर्षी चांगले उत्पादन अपेक्षित होते, परंतु पावसाने अपेक्षा भंग केला आहे. याशिवाय सुपारी, कांदा आणि आल्याच्या पिकांमध्ये विविध रोगांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकर्यांना अपेक्षित दाम न मिळण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यात कांदा, भुईमूग, कापूस आणि सोयाबीन पिके शेतात सडत आहेत.
कृषीमंत्री बी.सी. पाटील यांनी पिकांवर पडलेल्या विविध रोगांच्या संसर्गाची माहिती मिळताच कृषी व फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खेड्यात जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पिकांच्या सुरक्षतेविषयी माहिती दिली जात असल्याचे म्हंटले आहे.