सुरक्षिततेसाठी बोटींसह अन्य यंत्रणा सज्ज
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात 10 ते 12 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. तहसील प्रशासनासह ग्रामपंचायत, नगर पंचायतीने धोकादायक तसेच दरडग्रस्त भागातील कुटुंबियांना स्थलांतराच्या नोटीस बजावल्या आहेत. पूरग्रस्त भागात बोटींसह आपत्कालीन यंत्रणाही सज्ज झाली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने अनेक ठिकाणी पथके तयार केली आहेत. तसेच पूर परिस्थिती व सफाईसाठी कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरीत तहसील यंत्रणा सज्ज
यामध्ये रत्नागिरी जिह्यातील 31 गावांना धोका असून रत्नागिरी तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे. या चार गावातील लोकांना स्थलांतर करण्यात येणार नाही, मात्र येथे अलर्ट राहण्याच्या सूचना तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 10, 11 जून रोजी 200 मिमी पावसाची नोंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच एनडीआरएफचे पथक गुरुवारी रात्रीपर्यंत दाखल होणार आहे. 2 पथके दाखल होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, चांदेराई, हरचेरी आणि टेंभ्ये गावांना अतिवृष्टीचा धोका आहे, मात्र नागरिकांना स्थलांतर करण्याची गरज नाही. तरीही कोणतीही बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीलाही योग्य त्या खबरदारीच्या सूचना केल्या गेल्याची माहिती रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली.
जिह्याला ‘ऑरेंज’ अलर्ट जारी
जिह्यात 10 ते 12 जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चिपळुणात 14 पथके तयार
चिपळूणः अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने 14 पथके तयार केली आहेत. पूर परिस्थिती व सफाईसाठी तब्बल 160 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 4 बोटींसह अन्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तर व्यापाऱयांनीही आपले साहित्य सुरक्षित ठेवले आहे. शहरात नगर परिषदेची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. जोरदार पाऊस पडून पूर आला. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले तर नागरिकांना मदत करता यावी, शहर तात्काळ स्वच्छ करता यावे यासाठी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर परिस्थितीसाठी 7 व सफाईसाठी 7 अशी 14 पथके तयार करण्यात आली आहेत. या दोन्ही पथकांमध्ये तब्बल 120 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोहणाऱया 12 तरूणांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच भाडे व स्वतःची अशा मिळून 3 यांत्रिकी बोटी, 1 होडी, 60 लाईफ जॅकेट, 25 रबरी टय़ुब, 7 बोये, दोन मोठे दिवे आदी यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.
गुहागरात दरडग्रस्त गावांची पाहणी
गुहागरः अतिवृष्टीच्या अतिदक्षतेवर गुहागर तालुक्यातील खाडीकिनारी व समुद्रकिनारी असलेल्या 26 गावातील 920 कुटुंबातील 2760 बाधित व्यक्तींना स्थलांतराची नोटीस गुहागर महसूल विभागाच्यावतीने बजावण्यात आली आहे. दरडग्रस्त व पूरप्रवण क्षेत्र गावाची गुहागर तहसील व पंचायत समिती प्रशासनाने मंगळवारी भेट घेऊन पाहणी केली. अतिवृष्टीबाबत दिलेल्या दक्षतेच्या आदेशाबरोबर गुहागर तालुक्यातील पूरप्रवण क्षेत्र गावात वडद, पालशेत, परचुरी तर दरडग्रस्त गावांमध्ये कुडली व काजरोळकरवाडी(पोसरे) यांचा सामावेश आहे. गुहागर तहसीलदार लता धोत्रे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, गुहागर सर्कल अधिकारी, त्या-त्या गावातील तलाठी, ग्रामसवेक यांना बरोबर घेऊन वडद बौद्धवाडी येथील दरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर परचुरी, पालशेत आगडीमंदिर, पडवे, कारूळ आदी गावांमध्ये भेट देऊन तेथील कुटुंबांना दक्षता राखण्यासह स्थलांतराबाबतही कळविले आहे.
राजापुरात सतर्कतेचे आवाहन
राजापूरः अतिवृष्टी काळात तालुक्यातील जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून अशा काळात काही आपत्ती ओढवल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेवून प्रशासनाने राजापूर शहरासह 35 गावांमध्ये निवारा केंद्राचे नियोजन करताना 3 हजार 990 लोकांचे स्थलांतर करण्याची तयारी ठेवल्याची माहिती वराळे यांनी दिली. तरीही नागरिकांनी संभाव्य वादळाचा धोका लक्षात घेता सतर्क राहण्याचे आवाहन तहसिलदार वराळे यांनी केले आहे.
दापोली तालुक्यात 2510 नागरिकांचे स्थलांतर
दापोलीः जिह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 2510 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तालुक्यात पाणी भरण्याची शक्यता असणारी गावे 15 असून याच गावातील 280 कुटुंबे व 1329 नागरिक आणि 8 दरड प्रवण ठिकाणांहून 313 कुटुंबे व 1181 नागरिक अशा एकूण 593 कुटुंबातील 2 हजार 510 नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.









