राजापूर, खेड, संगमेश्वरात पूर , चांदेराई, माखजन बाजारपेठही पाण्याखाली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवारी वादळी वाऱयासह झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील सर्वच नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाला आहे. राजापूर, खेड, संगमेश्वर, रत्नागिरीतील चांदेराई बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले असून चिपळुणातही पुरसदृश स्थिती होती. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून विद्युत पुरवठाही खंडीत झाला आहे. दरम्यान, अर्जुना नदीने धोका पातळी ओलांडल्याने वरचीपेठ येथील ब्रिटीशकालीन पुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस कोकणात पुन्हा सक्रीय झाला आहे. कोकणात 8 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळपासून जिल्हय़ात पावसाचा जोर वाढला, सोमवारी रात्री रात्रभर वादळी वाऱयासह कोसळलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पुढील 24 तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
खेड पुराचे पाणी घुसले!
खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून मंगळवारी सकाळी 8 च्या पुराचे पाणी मटण-मच्छी मार्केटमध्ये शिरले. नारिंगीचे पाणीही सुर्वे इंजिनिअरिंगनजीक आल्याने मार्गावर काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
राजापूर शहराला पूराचा वेढा
राजापूर तालुक्यातील मंगळवारी अर्जुना व कोदवली नदीच्या पुराच्या पाण्याने शहराला वेढा दिला जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ापर्यंत पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शिवाजीपथ, बंदरधक्का, वरचीपेठ रस्ता, गुजराळी रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद होती. दरम्यान प्रिंदावण बांदीवडे गावातून गेलेल्या सुखनदीचे पाणी प्रिंदावण, बांदीवडे, तळेखाजन आदी परिसरातील भातशेतीमध्ये शिरले आहे.
चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली
अतिवृष्टीने काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठ, सोमेश्वर, काजरघाटी, पोमेंडी, गुरूमळी येथील नदीकाठचा परिसर जलमय झाला. चांदेराई परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हरचिरी पुलावरून होणारी वाहतूकही रोखण्यात आली होती.
काजळीच्या पुराचा दत्तमंदीरला वेढा
लांजा तालुक्यातील काजळी, मुचकुंदी या मुख्य नद्यांना पुर आला असून काजळी नदीच्या पुराने आंजणारीतील दत्तमंदीराला वेढा दिला आहे. लांजा- कोर्ले व दाभोळे वाटूळ रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठय़ा खडय़ांमध्ये पाणी साचुन रस्त्यांना गटाराचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक मंदावली होती.
संगमेश्वरात बाजारपेठा पाण्यात
सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर बाजारपेठ, माखजन, फुणगूस आणि कसबा बाजारपेठांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रामपेठ, माखजन, कसबा आणि फुणगूस बाजारपेठांतील दुकांनाचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.









