प्रतिनिधी / मेढा :
जावली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागाबरोबरच मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील गावात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ओढ्या-नाल्यांचे पात्रच बदलल्यामुळे शेतीचे बांध वाहून गेले. तसेच वाहून आलेल्या गाळाने शेतजमीन पुरती भरून गेली. नदी, ओढय़ाकाठची शेतीच गायब झाली. यामुळे तालुक्यातील 561.60 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, यातील 4815 शेतकऱ्यांचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांतर्गत पंचनामे झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.
अस्मानी संकटामुळे जावलीतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने केळघर आणि परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभ्या भात पिकांसह शेतीच वाहून गेली. शेतातील अनेक विहिरी गाळाने भरल्या. डोंगरावरून वाहून आलेले मोठमोठे दगड, झाडांची खोडे शेतात येऊन साचली. कधीही भरून न निघणारी हानी या अतिवृष्टीमुळे घडून आली. कोरोना काळात शेतीकडे लक्ष देऊन केलेली नवनिर्मिती मात्र पुरामध्ये लुप्त झाली. यामुळे अनेकांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.









