ऑनलाईन टीम / पुणे :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार 18 ते 19 ऑक्टोबर या दोन दिवसातमराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या भागांचा दौरा करणार आहेत. यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतील. तसेच ते तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देणार आहेत.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शनिवारी सकाळीच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. पूर नेमका कशामुळे आला आणि आता काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, राज्यभरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार किंवा स्वतः देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.