शहर वार्ताहर/ राजापूर
जून ते ऑक्टोबर 20 दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे जिह्यातील बाधित झालेल्या नागरीकांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून रत्नागिरी जिह्यासाठी 8 कोटी 47 लाख 99 हजार रूपये उपलब्ध झाले आहेत. तर तालुक्यासाठी सुमारे 65 लाख रूपये अनुदान प्राप्त झाले आहे. येत्या दोन दिवसामध्ये अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे.
यावर्षी पावसाळयात अतिवृष्टीमुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. शेतीच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत पावसाने शेतकऱयांची पाठ सोडली नाही अगदी भात कापणी चालू असतानाही शेतकऱयांची शेती वाहून गेली तर काही शेती पाण्याखाली गेली. यामुळे काही हातातोंडाशी आलेले पिकही पावसाने काढून घेतले. या पिकांचा व एकंदरीत नुकसानीचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱयांमधून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने काही अनुदान उपलब्ध झाले आहे. रत्नागिरी जिह्यासाठी 8 कोटी 47 लाख 99 हजार रूपये उपलब्ध झाले आहेत. तर तालुक्यासाठी सुमारे 65 लाख रूपये अनुदान प्राप्त झाले आहे.
जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीत घरे पुर्णतः जमिनदोस्त झालेल्या नागरीकांसाठी कपडे, घरगुती साहीत्य, मृत जनावरांसाठी मदत, शेतीपिके व बहुवार्षिक पिकांचे नुकसान एसडीआरएफच्या दराने रूपये 6 हजार 800 प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार रूपये प्रतिहेक्टर मदत देण्यासाठी अनुदान प्राप्त झाले आहे. राजापूर तालुक्यासाठी सुमारे 65 लाख रूपये अनुदान प्राप्त झाले असून लवकरच हे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या बँकखातेमध्ये वर्ग करण्यात येणार आहे.









