विधानपरिषद विरोधी पक्ष नेत्यांनी केली मागणी : विशेष वेळ देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हय़ांना मोठा फटका बसला आहे. याबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी सभागृहात चर्चा करण्याबाबत प्रस्ताव मांडला. त्यावर यासाठी विशेष वेळ देऊ, असे आश्वासन विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी दिले. येत्या दोन दिवसांत यावर जोरदार चर्चा होणार आहे.
महापूर, अतिवृष्टीमुळे रस्ते, शेती, सार्वजनिक आस्थापने, अनेकांची घरे कोसळली आहेत. मात्र, सरकारने अद्याप या नुकसानग्रस्तांना कोणतीच नुकसानभरपाई दिली नाही. यामुळे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 12 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 70 लाख एकरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इतक्मया मोठय़ा प्रमाणात आजपर्यंत नुकसान झाले नव्हते. मात्र, सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी केला.
राज्यातील 25 हजार घरांचे नुकसान झाले आहे. 320 जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे शेतकऱयांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या डोळय़ांत पाणी आले आहे. मात्र, सरकारला याबाबत गांभीर्य नाही, हे मोठे दुर्दैव आहे, असा आरोपदेखील एस. आर. पाटील यांनी केला. वास्तविक सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने आतापर्यंत या महापुराची पाहणी केली नाही. सरकारकडे अद्याप याबाबतचा अहवालदेखील नाही. यावरून सरकार किती अपयशी आहे, हे जनतेला दिसून येत आहे. तेव्हा या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
होरट्टी यांनी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जण त्यामध्ये भरडले गेले आहेत. त्यावर चर्चा होणारच आहे. त्यासाठी अधिक वेळ दिला जाईल. मात्र, आज या विषयावर चर्चा नको तर इतर वेळी योग्य वेळ देऊन सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.









