कोयना धरणाचे दरवाजे 1 फुटांनी उघडले : धरणातून प्रतिसेकंद 11 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू : पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू
प्रतिनिधी / नवारस्ता
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱयामुळे काठोकाठ भरलेल्या कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे मंगळवारी 1 फुटांनी उघडले आहेत. कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 11 हजार 449 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
कोयना धरण सध्या फुल्ल भरले असल्यामुळे पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडा जरी वाढला तरी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आता तर हवामान खात्याने येत्या चोवीस तासांत कोकण किनारपट्टीसह राज्यात सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कोयना सिंचन विभागाने सोमवारीरात्री पासूनच धरणाच्या पायथा विजगृह सुरू करून धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला.
मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरु झाल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक ही वाढू लागली आहे. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी 3.30 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट उचले आहेत. प्रतिसेकंद 9 हजार 380 क्यूसेक्स आणि पायथा विजगृहातून 2100 क्यूसेक्स असे मिळून कोयना धरणातून एकूण 11हजार 449 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासूनच पुन्हा पावसाला सुरवात झाली असून गेल्या चोवीस तासात म्हणजे मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनानगर येथे 12 मिलिमीटर,नवजा येथे 8 मिलिमीटर, आणि महाबळेश्वर येथे 2 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद 2 हजार 868 क्यूसेक्स इतकी पाण्याची आवक सुरू आहे. तर धरणात 104.60 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.









