प्रतिनिधी / विटा
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार बरोबरच केंद्रानेही मदत केली पाहिजे. आम्ही मनसेच्यावतीने नुकसानीची पाहणी करीत आहोत. याचा अहवाल पक्ष प्रमुख राज ठाकरे स्वतः सरकारला सादर करतील, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मांडली.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या डाळिंब, द्राक्ष आणि खरीप हंगामाच्या पिकांची पाहणी करण्यासाठी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव खानापूर आणि आटपाडी तालुका दौऱ्यावर आले होते. पाहणी दौरा झाल्यानंतर विट्यातील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी जाधव, खानापूर तालुकाध्यक्ष साजिद आगा उपस्थित होते.
जाधव म्हणाले, रब्बी हंगामातील पिके ऐन काढणीच्या वेळी मार्चमध्ये लॉकडाऊन झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सलग दुसरे ही पिक वाया गेले आहे. आटपाडीत डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तोंडावर दिवाळीचा सण आहे. त्यामुळे त्याच्या आत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मदत करावी. इथली परिस्थिती आम्ही राज ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहोत. मनसेच्यावतीने विविध नेते, पदाधिकारी राज्यभर पाहणी दौरे करून एक व्यापक अहवाल लवकरच तयार करू. राज ठाकरे स्वतः हा अहवाल सरकार पुढे सादर करतील.
जाधव म्हणाले, महाराष्ट्र वाल्मिकी आणि महाकवि, थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मगावी शेटफळे येथे भेट दिली. तेथील इमारतीची दुरावस्था झाली आहे. इथले लोकप्रतिनिधी काय करतात ? असा सवाल करीत गदिमांच्या सारखा मोठा साहित्यिक इथे जन्मणे, हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. मात्र येथे एखाद्या साहित्यिकाचे स्मारक म्हणून ज्या काही गोष्टी असायला पाहिजेत त्या अजिबात नाहीत. इथले आजी – माजी लोकप्रतिनिधी सगळेच आपले स्वार्थी राजकारण करण्यात मग्न आहेत. अशी टीकाही जाधव यांनी केली.
यावेळी कृष्णत देशमुख, विपुल बुधावले, विनोद कांबळे. राजेश जाधव,अशोक सुळे, राकेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.








