हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे संताप : शेतकऱयांच्या जीवाला धोका असल्याने दुरूस्तीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अतिवाड येथील शिवारात वीजखांब एका बाजूला कलंडले असून वीजतारा देखील लोंबकळत पडल्या आहेत. त्यामुळे शिवारात काम करणाऱया शेतकऱयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी देऊन देखील हेस्कॉमचे याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परिसरात काही ठिकाणी वीजखांब पडून मोडले आहेत. तर काही ठिकाणी कलंडले आहेत. काही ठिकाणी वीजतारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शेतकऱयांसह जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतले आहेत. बैलजोडी व ट्रक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत सुरू आहे. शेतकवाडीतील विद्युतखांब वाकले असून वीजतारा जमिनीवर लोंबकळत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. शेतकरी किंवा जनावरांचा न कळत स्पर्श या विद्युत भारित तारांना झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
पेरणीच्या तयारीसाठी शेतकऱयांची शिवारात वर्दळ वाढली आहे. तसेच रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱयांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. हेस्कॉमच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱयांना बसण्याची चिंता व्यक्त होत आहे. शिवाय याबाबत वांरवार तक्रारी देऊन देखील हेस्कॉमचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. दरम्यान शिवारात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असून शेतकरी चिंतेत सापडले
आहेत.
वीजखांब व वाहिन्या खाली लोंबकळत असल्याने शेतकऱयांना शिवारात फिरणे देखील धोक्मयाचे बनले आहे.
त्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखालीच वावरताना दिसत आहेत. वीजतारा जमिनीलगत लोंबकळत असल्याने शेती करणे देखील अडचणीचे झाले आहे. काही ठिकाणी वीजवाहिन्या हाताच्या अंतरावर लोंबकळत असल्याने ये-जा करणे देखील धोकादायक बनत आहे. हेस्कॉमने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडेने दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.