वार्ताहर/ उचगाव :
बेळगाव तालुक्मयातील पश्चिम भागातील अतिवाड हे गाव सध्या हॉटस्पॉट झोनमध्ये गेले आहे. गेल्या दोन दिवसात गावातील कोरोनाची संख्या पंधरावर पोहोचली असून क्वारंटाईनमध्ये 61 जण आहेत. परिणामी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
अतिवाड गावातील सर्वाधिक नागरिक कामानिमित्त मुंबईला वास्तव्य करून आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या धुमाकुळामुळे मुंबईहून अनेक जणांनी अतिवाड गाव गाठले. गावात शिरकाव करताच त्यांना शाळांमधून क्वारंटाईन करण्यात आले.
जवळपास 51 नागरिकांना 14 दिवसांनंतर स्वॅबचा अहवाल येण्याआधीच घरी पाठविण्यात आले. यापैकी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच गोंधळ सुरू झाला. चौदा दिवसांनंतर अनेक व्यक्तींचे पै-पाहुणे, मित्रमंडळी यांच्या घरी जाऊन भेटीगाठी, खाणेपिणे मनसोक्त झाले होते. आकस्मिक अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली आहे.
अतिवाड गावामध्ये सध्या 15 जणांच्या पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी स्वतःचीच काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या 15 जणांवर सध्या बेळगाव सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील 61 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.









