ग्रा. पं. चे दुर्लक्ष, स्वच्छतेची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
अतिवाड गावात गटारीमध्ये माती व कचरा भरून झुडूपे वाढली असून यामुळे गावाला झुडूपांचा वेढा पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या समस्येकडे ग्रा. पं. चे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील कित्येक दिवसांपासून गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
बेकिनकेरे ग्रा. पं. हद्दीत अतिवाड गावचा समावेश आहे. मात्र या गावात गल्लोगल्ली गटारीतून झुडूपांची वाढ झाल्याने गटारी पूर्णपणे झाकोळल्या आहेत. शिवाय कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. झुडुपांमुळे डास, माशांबरोबर सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. संबंधित ग्रा. पं. ने तातडीने गटारींची स्वच्छता करून झुडूपे हटवावीत, अशी मागणी होत आहे.
गटारीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाक मुठीत धरून घराबाहेर पडावे लागत आहे. शिवाय गटारीतून झुडपे वाढल्याने अनेकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत ग्रा. पं. कडे तक्रारी करूनदेखील साफ दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. ग्रा. पं. ने तातडीने गटारींची स्वच्छता न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.









