बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यात कॉंग्रेस आणि भाजप अपयशी ठरले आहेत. असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले.
कुमारस्वामी यांनी ट्विट करत, या प्रकरणात दोन्ही पक्षांच्या मनोवृत्तीत कोणताही फरक नाही. या समस्येचे निराकरण करण्याची इच्छाशक्ती या दोघांमध्ये नाही. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण करणे सोपे झाले आहे कारण या प्रकरणात सामील असलेल्या राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस कोणाकडेही नाही. त्यांच्या उदासीनतेमुळेच अशा माफियांना अभय मिळत आहे.
महसूलमंत्री आर. अशोक यांनी स्वतः विधान परिषदेत विधान केले की अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात सरकार अक्षम आहे. महसूलमंत्र्यांच्या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे की हे सरकार अशा माफियांवर कोणतीही कारवाई करणार नाही. कॉंग्रेसच्या सरकारच्या काळातही अशीच परिस्थिती होती. यासंदर्भात हाऊस कमिटीचा अहवालही तसाच राहिला आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.









