प्रतिनिधी/ पणजी
पणजी महानगरपालिका मार्केटमधील व्यापाऱयांनी आज सकाळी अचानकपणे बंद पुकारला. महापालिकेने मंगळवारी मार्केटमधील अतिक्रमणे हटवली होती. त्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला. भाजी फळे विकत घेण्यासाठी सकाळी मार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली. महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई सुरूच राहील असे स्पष्ट केले आहे.
पणजी मार्केट बंद पुकारला आहे. अचानक महानगरपालिकेच्या पदाधिकाऱयांनी मार्केटमधील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली. व्यापाऱयांना याविषयी काहीच माहिती देण्यात आली नाही. नगराध्यक्ष किंवा आयुक्तांनी व्यापाऱयांना जागा नाही म्हणून काही प्रमाणात सामान ठेवण्यासाठी सोय करून दिली होती. परंतु मनपाने सदर जागा अतिक्रमण म्हणून त्याची तोडफोड केली. व्यापारी सोपो कर देतात. काही व्यापाऱयांना वीज पाणी मिळत नाही. काही व्यापाऱयांची आस्थापनांची तोडफोड केली. या कारवाईच्या निषेधाबद्दल हा बंद पुकारण्यात आला आहे. मनपाने व्यापाऱयांच्या पोटावर पाय ठेवला आहे. हा अत्याचार अशाप्रकारे असाच सुरू राहिला तर सहन करणार नाही. सरकारने याची दखल घेणे गरजेचे आहे अशी मागणी पणजी मार्केट टेनंट संघटनेचे राजेंद्र धामस्कर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पणजी मार्केटमध्ये जी मनपाकडून कारवाई झाली त्यातून व्यापाऱयांना त्रास झाला. सरकारची व्यापाऱयांवर असलेली अन्यायकारक भूमिका काही दिवसांपासून दिसून येत आहे. लॉकडाऊन काळात व्यापाऱयांकडून घेतलेल्या मालाचे पैसे अजूनपर्यंत सरकारने दिले नाहीत. मकर संक्रातनिमित्त व्यापाऱयांनी माल बाहेर ठेवण्यात आला होता. सरकार व्यापाऱयाला भिकारी समजतात का? सरकारने व्यापाऱयांसाठी व्यापार धोरण तयार करावे. व्यापाऱयांना गृहित धरू नये. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मार्केटमध्ये दोन तासांची भेट द्यावी आणि व्यापाऱयांच्या समस्या समजून घ्याव्यात. प्रत्येक दिवशी व्यापारी एक एक पैसा जोडून व्यापार करतो. त्यामुळे अशांवर घाला घालू नये. अधिकाऱयांवर कारवाई करावी आणि एक नियंत्रित व्यवस्था तयार करावी अशी मागणी अखिल गोवा व्यापारी संघटनेचे समन्वयक आशिष शिरोडकर यांनी सांगितले.
कारवाईदरम्यान अनेक दुकांनाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली आणि यातून व्यापारी दुकांनामध्ये नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. तेव्हा योग्य ती कारवाई करण्यात आली. याशिवाय पणजी मार्केटमधील काही दुकाने बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करत असल्याचे आढळून आले. तसेच दुकानातील सामांनाची स्थितीही वाईट होती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
मंगळवारी पणजी मार्केट संकुलामध्ये विक्रेत्यांना आखून दिलेल्या जागेपेक्षा अधिन जागा व्यापल्याने व त्यात बदल करून माल ठेवल्याने मनपाच्या मार्केट समितीतर्फे कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मार्केट संकुलातील विक्रेत्यांनी रचून ठेवलेल्या मालासंदर्भात व अस्वच्छतेबाबत पणजी मनपाला अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. स्वच्छता राखा तसेच विक्रेते नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आणून देऊन सूचना केल्या होत्या. परंतु याकडे काहींनी दुर्लक्ष केले होते.









