लॉकडाऊनचा निर्णय घेताना नेमका कोणता विचार करण्यात आला, काय साध्य होणे अपेक्षित आहे, ‘कडक’ म्हणजे काय, कोणत्या गोष्टी सुरू किंवा बंद राहणार याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे या लादलेल्या टाळेबंदीच्या यशाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा प्रसाराचा वेग वाढत आहे. सुरुवातीला चाकरमान्यांपुरताच मर्यादित राहिलेल्या कोरोनाची आता स्थानिकांनाही मोठय़ा प्रमाणावर लागण होत आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी या दोन्ही जिल्हय़ांमध्ये आठवडाभर कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. मात्र हा निर्णय घेताना नेमका कोणता विचार करण्यात आला, काय साध्य होणे अपेक्षित आहे, ‘कडक’ म्हणजे काय, कोणत्या गोष्टी सुरू किंवा बंद राहणार याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे या लादलेल्या टाळेबंदीच्या यशाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने केंद्रापाठोपाठ टाळेबंदीतून सूट देणारे धोरण स्वीकारले. टाळेबंदीत अनेक स्वरूपाच्या निर्बंधांना लोकांना तोंड द्यावे लागत होते. हे निर्बंध हळूहळू मागे घेण्याचे काम शासकीय यंत्रणेकडून सुरू झाले. राज्यातील सलून व ब्युटी पार्लर सुरू करण्याची मुभा देण्यात आली. नंतर कोणतेही कारण न देता ती मागे घेण्यात आली. कोणाच्यातरी मनात आले म्हणून राज्यपातळीवर तर्कबुद्धीला फाटा देऊन निर्णय घेण्यात आले असे लोक म्हणत आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिह्यांमध्ये सुरुवातीला कोरोनाच्या प्रसाराचे प्रमाण अल्प राहिले आहे. राजकीय नेत्यांच्या धोरणीपणामुळे मुंबई, पुणे सारख्या रेड एरियामधील लोकांना कोकणात येण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र समन्वय व अन्य सुविधांच्या अभावी त्यात मोठे गोंधळाचे वातावरण दिसले. पाशासनाला तर आपली हतबलताही व्यक्त करावी लागली. कोकणात दाखल झालेल्या या चाकरमान्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. मात्र आता पॉझीटीव्ह अहवालांमध्ये स्थानिकांची संख्या वाढू लागल्यानंतर कोरोनाला आळा घालण्यासाठी पुन्हा कडक टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांमध्ये 1 आठवडय़ाची टाळेबंदी लागू करण्यात येईल अशा आशयाच्या घोषणा दोन्ही जिल्हाधिकाऱयांनी केल्या. ही टाळेबंदी पूर्वीपेक्षा कडक असेल असेही जाहीर करण्यात आले. मात्र, 8 दिवसांच्या टाळेबंदीचा काय व कसा परिणाम होणार याबाबत स्पष्टीकरण केलेले नाही. त्याचबरोबर ‘कडक’ म्हणजे नेमके काय याबाबतही संभ्रमावस्था आहे. रत्नागिरीत मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तरी नेमके काय बंद राहणार व काय सुरू राहणार याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे या नव्या टाळेबंदीबाबत संभ्रमावस्था व तेवढीच नाराजीही दिसून येत आहे. राज्य सरकारने निर्बंध वाढवण्याची जी थोडकी क्षेत्रे जाहीर केली आहे, त्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गचा अजिबात समावेश नव्हता. असे असताना दोन्ही जिल्हाधिकाऱयांना टाळेबंदीचा आदेश जारी का करावा लागला याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. लोकांना अशा स्वरूपाचा खुलासा देण्यास आपण बांधील आहोत असे दोन्ही जिल्हाधिकारी मानतात का हा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.
टाळेबंदीमुळे चेन तोडण्यात यश येईल असे राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी म्हणत आहेत. प्रत्यक्षात टाळेबंदीमुळे देशभरात कोठेच रुग्णसंख्या कमी झाली नाही, म्हणजे चेन तोडली गेली असे म्हणता येणार नाही. कदाचित अनेक वर्षे कोरोनावर प्रभावी औषध सापडणार नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. असे असताना कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू असे म्हणणे व्यवहार्य ठरणार नाही. सध्या एड्ससारख्या रोगांवर प्रभावी उपाय सापडला नाही. तथापि, त्यासोबत जगण्याचा व्यवहार देशाने हळूहळू आत्मसात केला आहे. कोरोनाविरुद्ध काम करायचे असेल तर शारीरिक अंतर, मुखपट्टी, हात निर्जंतुक करणे, स्वच्छता राखणे यासारखे महत्त्वाचे उपाय आहेत. आणि त्या उपायांशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. टाळेबंदी हे कोरोनाच्या विरुद्धचे उत्तर नव्हे हे आता स्पष्ट झाले आहे.
सोमवारी राज्य सरकारने अनलॉक-2 च्या सूचना जारी केल्या. त्यानंतर लगोलग जिल्हाधिकाऱयांनीही सूचना जारी करणे आवश्यक होते. मात्र तसे घडले नाही यामागचे नेमके कारण काय, ही प्रशासकीय गतिमानता आहे का असा प्रश्न उभा राहत आहे. कोकणात एका आठवडय़ाच्या टाळेबंदीची खरोखर गरज होती का यावर कोणत्याही तज्ञाने अवाक्षर काढलेले नाही. असे असताना दोन्ही जिल्हाधिकाऱयांना टाळेबंदी जारी करावी हा उत्साह कशाने बरं आला? राज्यातील अनेक जिह्यांमध्ये रुग्ण संख्या जास्त असूनही तेथे जिल्हय़ाधिकाऱयांनी टाळेबंदी केलेली नाही, मग कोकणातच का? टाळेबंदी जारी करण्यापूर्वी रुग्ण संख्या, प्रसाराचा वेग, आरोग्य यंत्रणेची तयारी अशा मुद्यांचा अभ्यास झाला का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
टाळेबंदी काळात अधिक भक्कम आरोग्य यंत्रणा उभारण्याची व्यवस्था जगभरातील अनेक देशांनी केली. तशी कोणती योजना आपल्यासमोर आहे हे दोन्ही जिल्हाधिकारी अद्याप बोलू शकलेले नाही. यानंतर गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात चाकरमानी पुन्हा एकदा कोकणात येणार आहेत. त्यावेळी कथित प्रकारे तोडलेली साखळी पुन्हा निर्माण करण्यासाठी अनेक रुग्ण सापडण्याची भीती आहे. त्यावेळी पुन्हा एकदा तर्कहीन टाळेबंदी लागू होणार का हा प्रश्न कोकणवासियांना छळत आहे.
लोक आधीच हालअपेष्टांना तोंड देत आहेत. अनलॉकमध्ये लोक स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सरकारी धोरणाला धक्का देऊन काहीतरी वेगळे केले असे दाखवून देण्याचा प्रयत्न होतो आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. टाळेबंदी करायची ती केवळ एक आठवडय़ासाठी तरी का, याही प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकाऱयांकडून जनतेसाठी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे सध्या सहन करणे हेच जनतेच्या नशिबी आले आहे.
सुकांत चक्रदेव








