विजयकांत यांच्या पक्षाने सोडली साथ
चेन्नई
तामिळनाडूत अण्णाद्रमुक-भाजप आघाडीला निवडणुकीपूर्वी झटका बसला आहे. अभिनेता विजयकांत यांच्या नेतृत्वाखालील डीएमडीकेने पुढील महिन्यात होणाऱया राज्याच्या निवडणुकीपूर्वी आघाडीतून काढता पाय घेतला आहे. तीन फेऱयांमधील चर्चेनंतर अण्णाद्रमुकने आश्वासनानुसार जागा देण्यास नकार दिल्याचे डीएमडीकेने म्हटले आहे. 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात राज्यात निवडणूक होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे. करिष्माई आणि शक्तिशाली नेत्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर सत्तारुढ अण्णाद्रमुककरता ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. तर द्रमुक-काँग्रेस आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठय़ा विजयाची अपेक्षा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुक-काँग्रेस आघाडीला 39 पैकी 38 जागांवर विजय मिळाला होता. अण्णाद्रमुकने भाजपला 234 पैकी 20 जागा दिल्या आहेत. तर पीएमकेला 23 जागा मिळाल्या आहेत. अण्णाद्रमुककडून 6 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यावर डीएमडीकेने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूत या पक्षांसह कमल हासन यांचा पक्ष एमकेएम पहिली विधानसभा निवडणूक लढविणार आहे. सोमवारी एमकेएमने 154 जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.









